आलापल्ली : आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या मार्र्कंडा वन परिक्षेत्रात कार्यरत असलेला किशोर केवलराम सहारे हा कर्मचारी निलंबित कालावधीतील १३ महिने सात दिवसांचे ५० टक्के प्रमाणे थकीत वेतन मिळविण्यासाठी पायपीट करीत आहे. मात्र अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. बिबट कातडी प्रकरणात सहारे यांना २००९ साली निलंबित करण्यात आले. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दाेष मुक्तता केली. या कालावधीत केलेल्या कामाचे ५० टक्के वेतन अदा करण्यात आले. मात्र उर्वरित ५० टक्के वेतन देण्यास वन विभाग टाळाटाळ करीत आहे. निलंबन कालावधीनंतर त्यांना गट्टा वन परिक्षेत्रात स्वच्छक पदावर नेमण्यात आले होते. त्यांच्याकडे वाहन चालकाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. या वाहनचालकाचे २६ महिन्यांचे अतिरिक्त वेतन त्यांना देण्यात आले नाही. तेथील प्रभारी वन परिक्षेत्राधिकारी तेलंग व लिपीकाचे काम करणारा वनमजूर महानंद वाकडे यांनी दीड वर्ष या वेतनाचा अर्ज स्वत:कडे दडवून ठेवला. याबाबतची माहिती सहारे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत विचारली असता, ती सुद्धा देण्यात आली नाही. याबाबत मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार सादर केली आहे. मात्र अजूनपर्यंत त्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे सहारे यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत. (प्रतिनिधी)
वेतनासाठी वन कर्मचाऱ्याची पायपीट
By admin | Updated: April 20, 2015 01:33 IST