देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा-आलापल्ली-आष्टी-चामोर्शी-गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-साकोली या नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ ११ मार्च २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते झाला. मात्र पावणे पाच वर्षांचा कालावधी उलटूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे देसाईगंज शहरातील बायपास रस्त्याच्या बांधकामाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे. सध्या येथील बायपास रस्ता जड वाहतुकदारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.
सिरोंचा-आष्टी-चामोर्शी- गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज- साकोली या राज्य मार्ग ३५३ सी चे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदाही काढण्यात आली होती. नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गासाठी १६२.२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन सदर काम तीन महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक हाेते. मात्र, अद्यापही काम संथ गतीनेच सुरू असल्याने हा मार्ग शहराच्या जुन्याच मार्गाने जाणार की बायपासने, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
राष्ट्रीय महामार्ग नेमका किती मीटर रुंदीचा राहणार, याबाबतही संभ्रम कायम असून दरम्यान ४० मीटर रुंदीचा राहणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुकडील अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले आहेत. तथापि भूमिगत पुलाच्या अप्रोच मार्गांवरुन केवळ दुचाकी, ट्रॅक्टर, चारचाकी वाहनेच आवागमन करू शकत असल्याने व रेल्वे पुलाची उंची फक्त ३.६० मीटर असल्याने मालवाहतूक वाहने बायपास मार्गाने वळविल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, सध्या या मार्गाची दुरवस्था झाल्याने जड वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत.
बाॅक्स...
रेल्वे फाटकामुळे बायपासची गरज
विशेष म्हणजे, रेल्वे गाड्यांच्या आवागमनामुळे वेळोवेळी रेल्वे फाटक बंद करण्यात येते. अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होताेे. त्यामुळे बराच वेळ जड वाहने उभी ठेवावी लागतात. त्यातही तीन किलोमीटर अधिकचा फेरा मारुन वाहतूक करावी लागतेे. हा मार्ग अद्यापही दुर्लक्षित असल्याने बांधकामाचे भिजत घोंगडे कायम आहे. लाेकसंख्या व वाढती रहदारी लक्षात घेता येथे फ्लाॅयओव्हर ब्रिज निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच जड वाहतुकीच्या सोयीसाठी तातडीने या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी केली जात आहे.