२० हजारांचा दंड : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल; विम्याच्या पैशावरून दोन भावांमध्ये झाले होते भांडण गडचिरोली : सख्या भावाचा खून करणाऱ्या पती पत्नीस पाच वर्षाचा सश्रम कारावास व २० हजार रूपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी ७ एप्रिल रोजी सुनावली. चामोर्शी तालुक्यातील मंजेगाव येथील गोपीका रोहिदास तुंकलवार यांनी पोलीस मदत केंद्र घोट येथे दिलेल्या तोंडी तक्रारीनुसार २२ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा पती मृत रोहिदास यांनी आपले भासरे आरोपी गणपती शंकर तुंकलवार यांना विम्याचे पाच हजार रूपये मिळाल्याने पैशाबाबत विचारणा करून पैसे मागितले, असता आरोपीने रोहिदाससोबत भांडण केले व काठीने मारण्यास सुरूवात केली. मारहाण चालू असताना गणपती तुंकलवार यांची पत्नी वंदना तसेच त्यांचा मुलगा जयेंद्र तुंकलवार याने सुद्धा रस्त्यावर असलेल्या काठीच्या ढिगाऱ्यातून काठी घेऊन हाता पायावर व डोक्यावर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर गोपीका तुंकलवार व गावातील वामन बंडावार यांनी रोहिदास यांना घरी आणून ठेवले. त्यांना गंभीर मारहाण झाल्यामुळे २३ फेब्रुवारी २०१५ चे पहाटे ते मरण पावले व या तक्रारीच्या आधारावर चामोर्शी पोलीस ठाण्यात आरोपी गणपती तुंकलवार, वंदना तुंकलवार, जयेंद्र तुंकलवार यांना २३ फेब्रुवारी २०१५ रोजी अटक करण्यात आली. जयेंद्र तुंकलवार हा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या विरूध्द बाल न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. आरोपी गणपती तुंकलवार व वंदना तुंकलवार यांच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायाधीश एक यांच्या न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार नोंदविण्यात आले. जिल्हासत्र न्यायाधीश वर्ग- १ यू. एम. पदवाड यांनी साक्षपुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपींनी अचानकपणे कोणताही उद्देश नसताना परंतु मारहाण केल्यामुळे तो मरण पावू शकतो. या निष्कर्षावर येऊन भादंविच्या ३०४ भाग २ सहकलम ३४ अन्वये दोषी ठरवून प्रत्येकी पाच वर्ष सश्रम कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी गोपीका रोहिदास तुंकलवार यांना देण्यात यावी, असा आदेश पारीत केला आहे. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल प्रधान यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्याचा तपास चामोर्शी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नितीन पोळ यांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी) विनयभंग प्रकरणी आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या मुरखळा माल येथील आरोपी नितेश रामटेके याला जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग-२ एस. टी. सूर यांनी ७ एप्रिल रोजी तीन वर्षे सश्रम कारावास व ३ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. २६ आॅगस्ट २०१५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास मुरखळा माल येथील नितेश रामटेके (१५) हा अल्पवयीन मुलगा पीडित मुलीच्या घरी गेला. ती एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिचे तोंड दाबले व मोठ्या बहिणीाला लाथाबुक्यांनी मारहाण करून घरून पळून गेला. पीडित मुलीने चामोर्शी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे साक्षीदाराचे बयान नोंदवून सरकारी पक्षाचा युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर आरोपी नितेश रामटेके याला भादंविच्या कलम ३५४ (अ) व कलम १२ बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये दोषी ठरवले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता निलकंठ भांडेकर, सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरिक्षक जयेश खंडरकर यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्याचा तपास उपनिरिक्षक प्रशांत माने यांनी केला.
खून करणाऱ्या पती पत्नीस पाच वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 01:37 IST