अहेरीत आढावा बैठक : खासदारांचे प्रशासनाला निर्देशअहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये दोन रूपये किलो प्रमाणे गहू व तीन रूपये किलो दराचे तांदूळ मोठ्या प्रमाणावर वितरित करा, असे निर्देश गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी अहेरी येथे आढावा बैठकीदरम्यान प्रशासनाला दिले.या बैठकीला अहेरीचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, संवर्ग विकास अधिकारी सुनिल तडस, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मडावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बोबडे, अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी प्रभाकर आत्राम, कुसनाके, उपविभागीय कृषी अधिकारी तांबे आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खासदार अशोक नेते यांनी पाणी टंचाईची समस्या, बोअरवेल दुरूस्ती, रोजगार हमी योजना, मनेरगा, विहीर, पांदन रस्ता, पंतप्रधान पीक विमा योजना, शेतकरी कृषी मेळावा, एलडब्ल्यूई, सीआरएफ, आर्टिकल २७५, पंतप्रधान ग्रामसडक योजना, खोदतळे, वनतळे, वैद्यकीय व्यवस्था, गाव तिथे रस्ता, जनधन योजना, स्व. गोपीनाथ विमा योजना आदींचा आढावा घेतला. गाव तिथे रस्ता बनवा, शेतकऱ्यांना योग्य मदत देण्याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृिष्टकोन बाळगावा, असे निर्देशही खासदार नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक तालुक्यात एक रूग्णवाहिका व सोबतच एक शववाहिकाही दिली जाणार असल्याची माहिती खासदार नेते यांनी या बैठकीत दिली.केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करून त्याची प्रभावी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देशही खासदार नेते यांनी दिले. या बैठकीला भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख बाबूराव कोहळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती सुवर्णा खरवडे, भाजपचे नगरसेवक गिरीश मद्देर्लावार, श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्त गावात धान्य वाटपावर भर द्या
By admin | Updated: April 10, 2016 01:33 IST