दिलीप दहेलकर गडचिरोली : सुदृढ आरोग्यासाठी आहारात विविध प्रकारच्या डाळींचा समावेश करण्याबाबत डॉक्टर नेहमी सांगतात. त्यात हृदयासाठी उडिद डाळ ही एक महत्त्वाची डाळ आहे. उडिद डाळीचा आहारात नियमित समावेश केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आवक वाढल्याने या डाळीचे दर आता कमी झाले आहेत. मात्र, असे असले तरी सर्व सामान्यांना शंभरी पार केलेली डाळ खरेदी करणे कठीण जात आहे.
उडिद डाळीत प्रोटिन्स, फायबर आणखी काय ?उडद डाळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे असतात, जे रक्तदाब स्थिर करण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करण्यास मदत तसेच उडिद डाळीमध्ये फायबर देखील असते, जे कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यास मदत करते.
साल असलेली डाळ आरोग्यासाठी लाभदायकउडिद डाळीचे दोन प्रकार आहेत. यात पॉलिश केलेली पांढरी डाळ म्हणजे साल काढलेली डाळ, काळी डाळ म्हणजे साल असलेली डाळ होय. यात आरोग्याच्या दृष्टीने साल असलेली डाळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.
हृदय निरोगी राहते, फायबर्स करतात वजन कमीउडिद डाळ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यातील अँटीऑक्सिडंटस हृदयाच्या आजारांपासून बचाव करतात. तसेच, डाळीतील फायबर्स वजन कमी करण्यास आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात.
"आवक वाढल्याने उडिद डाळीचे दर कमी झाले असून, सध्या काळी उडिद डाळ १२० रुपये किलोने विक्री केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी याच डाळीचे दर १५० रुपये किलोवर होते. मात्र, आता दर कमी झाल्याने, वडे, पापड व इतर पदार्थ करणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे."- ललिता चिचघरे, व्यापारी
"आहारात ज्याप्रमाणे पालेभाज्यांचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे डाळींचेदेखील महत्त्व आहे. यात उडिद डाळीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम या खनिजांचे प्रमाण मुबलक असते. ज्याचा शरीरातील हृदयच नव्हे, तर शरीर बळकट करण्यासाठी ही डाळ बहुपयोगी आहे."- डॉ. राज देवकुले, फिजीशियन, गडचिरोली.