लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २० वर्षानंतर कोरची येथील बाजारपेठ नेहमीप्रमाणे खुली राहिली. पाठोपाठ दामरंचा (ता. अहेरी) येथील ग्रामस्थांनी १ ऑगस्टला माओवाद्यांची दहशत झुगारून आपल्याकडील चार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या.
माओवाद्यांकडून २८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान नक्षल सप्ताह राबविला जात आहे. यात माओवादी सुरक्षा जवानांना हानी पोहोचविण्यासाठी हल्ले करतात, पुढच्या हिंसक कारवायांची व्यूहरचना आखत असतात. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात माओवाद विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे उपविभाग जिमलगट्टाअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम दामरंचा उप पोलिस ठाणे हद्दीतील नागरिकांनी पोलिसांप्रति विश्वास दाखवित माओवाद्यांच्या सप्ताहादरम्यान एकूण ३ भरमार बंदुका व एक बंदुकीचे बॅरेल पोलिसांच्या स्वाधीन केले. दामरंचा येथील प्रभारी उपनिरीक्षक पृथ्वीराज बाराते, अनिकेत संकपाळ व अंमलदार यांनी ग्रामस्थांच्या भूमिकेचे स्वागत केले.
अप्रिय घटना नाहीपोलिस प्रशासनाने नागरी कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविले. शिवाय आक्रमक कारवायाही केल्या आहेत, त्यामुळे माओवाद्यांची कोंडी झाली आहे. नक्षल सप्ताहात अद्याप कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. याशिवाय माओवाद्यांनी कोठे पोस्टर, बॅनर देखील टाकलेले आढळले नाही.
शिकारीसाठी व्हायचा बंदुकीचा वापरजिल्ह्यात जंगलक्षेत्र अधिक असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक पूर्वी पारंपरिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करीत असत. त्यामुळे वडिलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम-अतिदुर्गम भागात माओवादी याच बाबींचा फायदा घेऊन, सर्वसामान्य जनतेला माओवादी चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात.
१०५ बंदुका जीननक्षल सप्ताहात आपल्याकडील शस्त्रे जमा करण्याबाबत पोलिसांकडून आवाहन केले जाते. २०२२ मध्ये ७३,२०२३ मध्ये ४६, तर २०२५ मध्ये २६ बंदुका नागरिकांनी पोलिसांकडे जमा केल्या.