सिरोंचा : तालुक्यात धान पिकासोबतच कापूस व मिरची पिकाचीही लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. धान विक्रीसाठी शासनाचे आधारभूत खरेदी केंद्र आहेत. मात्र, कापूस व मिरचीसाठी असे कोणतेही केंद्र नसल्यामुळे तालुक्यातील कापूस व मिरची उत्पादक शेतकऱ्यांना पडत्या भावात आपला शेतमाल तेलंगणा राज्यात जाऊन विकावा लागत आहे.
सिरोंचा शहर तसेच तालुक्यात मिरची व कापसाचे शासकीय आधारभूत केंद्र नाही. तसेच खासगी खरेदी केंद्र तसेच जिनिंग मिलची स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी माल निघाल्यानंतर अडचणीत सापडतात. यावर्षी सिरोंंचा तालुक्यात धानासोबतच बऱ्याच क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने येथे खासगी अथवा शासकीय कापूस खरेदी केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात कापसाचे पीक घेतले जाते. तेलंगणात अनेक खासगी केंद्र (कापूस जिनिंग मिल) आहेत. कमी अंतरावर हे केंद्र असल्याने शेतकऱ्यांना कमी वेळेत कापसाची विक्री करणे सहज शक्य होते. तसेच अपेक्षेनुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत आहे. मात्र, सिरोंचा तालुक्यात एकही केंद्र नसल्याने येथील शेतकऱ्यांना आपला कापूस दलालांमार्फत तेलंगणाच्या व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. परिणामी, अल्प भाव मिळत आहे.
सिराेंचा तालुक्यात मिरची पिकाचेही उत्पादन घेतले जाते. हैदराबाद येथे मिरचीची माेठी बाजारपेठ आहे. मिरचीला मात्र चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी नागपूरच्या तुलनेत हैदराबाद येथेच मिरची विकण्यास पंसती दर्शवितात.