कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील रवींद्र मोतीराम नरोटे हे मोबाइलची बॅटरी खराब असल्याने येथील जावेद खानानी यांच्या माेबाइलच्या दुकानात त्याने बॅटरी खरेदी केली. नरोटे यांनी हातची पिशवी दुकानातच विसरली. दरम्यान तालुक्यातील शंकरपूरजवळ मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले. त्याच दिवशी सायंकाळी जावेद खानानी हे दुकान बंद करीत असताना पिशवी आढळून आली. तब्बल दहा दिवस उलटल्यानंतरही पिशवी संदर्भात चौकशी करण्यासाठी कुणीही न आल्याने खानानी यांनी दुकानातील कारागीर आबीद मिर्झा यांच्या समक्ष पिशवीची तपासणी केली असता त्यात १० हजार रुपये रोख, जमिनीचा सातबारा, आधार कार्ड व इतरही महत्त्वाच्या कागदपत्रांसह मोबाइल क्रमांक आढळून आला. लागलीच जावेद खानानी यांनी संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून सदर शेतकऱ्यास माहिती देऊन दुकानात बोलाविले. किराणा व्यावसायिक रिजवान खानानी व शफिकुर्रहमान यांच्या समक्ष पिशवी परत केली.
विसरलेली राेख रक्कम व दस्तावेज हाती लागताच शेतकरी भावूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:42 IST