गडचिरोली : अक्षय्य तृतीयेला पुजण्यासाठी लागणारी घागर बनविणे व उन्हाळ्यात वाढणारी माठांची मागणी पूर्ण करताना कुंभार व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक ठिकाणी माती उपलब्ध नसल्यामुळे मिळेल त्या ठिकाणाहून किमान हजार रुपये देऊन एक ट्रॉलीभर माती आणावी लागत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. शिवाय विविध भागांतून येणाऱ्या तयार वस्तूदेखील बाजारात दाखल आहेत. त्यामुळे कुंभार व्यावसायिकांवर यंदा दुहेरी संकट उभे ठाकले आहे. कुंभार व्यावसायिकांचे मुख्य भांडवल हे योग्य पद्धतीची माती हे असते. जेवढी जवळ माती उपलब्ध होईल तेवढे भांडवल कमी लागते असे चित्र असते. परंतु सध्या विविध वस्तू बनविण्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची मातीच मिळत नसल्याचे दिसून येते. परिणामी उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असलेले माठ तयार करण्यासाठी यंदा कुंभार व्यावसायिकांची कसरत सुरू झाली आहे. शिवाय अक्षय्य तृतीयेला पुजेसाठी लागणारी घागरदेखील यंदा संकटात सापडली आहे. मातीचा तुटवड्यामुळे यंदा माठाचे भावही वधारणार अशी शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)जागेचाही प्रश्न कायमबाजारात वस्तू विक्रीसाठी जागाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होते. बाजारातील अनेक व्यापारी आपल्या दुकानांसमोर वस्तू विक्रीसाठी बसू देत नाहीत. अनेक कुंभार व्यावसायिक जागेअभावी रस्त्याच्या कडेला अपुऱ्या जागेत मातीच्या भांड्याचे दुकान लावतात. त्यामुळे पालिकेने कुंभार व्यवसायिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कुंभार व्यवसायिकांतर्फे होत आहे.मातीचे प्रकारमाठ, घागर, चूल, खापर, पणती यासह मातीच्या इतर विविध वस्तू तयार करण्यासाठी चिकट आणि लवकर एकजीव होणारी माती आवश्यक असते. अशी मातीची खाण ही विशिष्ट भागातच असते. पूर्वी नंदुरबारच्या दहा ते १५ किलोमीटरच्या परिसरात अशी माती सापडत होती. परंतु अशा ठिकाणी करण्यात येणारी शेती, खाजगी अतिक्रमण, बांधकाम यामुळे आता माती कुणीही घेऊ देत नाही. परिणामी माती मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. माती मिळविण्यासाठी रॉयल्टीचाही प्रश्नच येतो. कुंभार व्यावसायिकांसाठी मातीची रॉयल्टी माफ करण्याचीही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. परंतु त्याकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. रेडिमेड वस्तूंमुळेदेखील या व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे. तयार मटके, प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या वस्तूंमुळे मातीचे मटके व घागर, चूल यांना मागणी राहत नसल्याचे कुंभार बांधवांनी सांगितले आहे.
माती मिळविण्यासाठी कसरत!
By admin | Updated: April 20, 2015 01:35 IST