देसाईगंज : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कसारी गावाने यावर्षी राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत सहभाग घेतला. नियमानुसार या गावाने सर्व निकष व अटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कसारी गावाने केलेल्या विकासात्मक व्यवस्थापन पाहून अखेर मूल्यांकन समितीही थक्क झाली. केलेल्या श्रमाचे फळ पुरस्कार रूपाने गावकऱ्यांना निश्चितच मिळेल, असा आशावादही समितीच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केला. कसारी गावाचे मूल्यांकन करण्यासाठी बुधवारी अमरावती येथील जिल्हा मूल्यांकन समिती गावात दाखल झाली. या समितीत प्रामुख्याने अमरावती विभागाच्या उपायुक्त प्रीती देशमुख, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त चव्हाण, चौकशी उपायुक्त सुनिल निकम, शिक्षणाधिकारी भाऊ टेकाम, पंचायत विस्तार अधिकारी उलेमाने आदींचा सहभाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धात्मक दृष्टिकोन समोर ठेऊन जिद्द व चिकाटीच्या बळावर यापूर्वी अनेक पुरस्कारप्राप्त कसारी हे गाव नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या नावलौकीकात आधीच मानाचा तुरा रोवणारे आदर्श गाव ठरले आहे. या गावाने सन २०१२-१३ मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकाविला. तर मार्गदर्शनाअभावी काही गुण कमी पडल्याने राज्यस्तरीय स्पर्धेत पुरस्कार निसटला. संपूर्ण गाव स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार व त्यासाठी आवश्यक त्या श्रमदानाची तयारी या भरवशावर पुन्हा या गावाने निराश न होता. या स्पर्धेत कसारी गावाने सहभाग नोंदविला होता. त्यादृष्टीने गावाचे मूल्यांकन करण्यासाठी अमरावतीची जिल्हा मूल्यांकन समिती गावात दाखल झाली व समितीच्या सदस्यांनी या गावाचे मूल्यांकन केले. यावेळी समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांनी श्रमदानातून तयारी केलेली परसबाग, बगीचा, जलशुद्धीकरण व व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षलागवड, पाणीस्त्रोत, सौर ऊर्जेचा वापर, बायोगॅस, प्लास्टिक बंदी, कुऱ्हाड बंदी, कुटुंब नियोजन, गावातील जातीय सलोखा, एक गाव एक पानवठा, सांडपाण्याचे व्यवस्थापन याबाबत तपासणी केली. तसेच ग्रामपंचायतीच्या दफ्तराची तपासणी करून १०० टक्के कर वसुली, शौचालयाची कामे, अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना दिलेला लाभ, घरकूल, १५ टक्के वैयक्तिक लाभाच्या योजना, बचतगटांना दिलेले कर्ज, याबाबत समितीने गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून तसेच घरोघरी जाऊन माहिती जाणून घेतली. दरम्यान समितीच्या सदस्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. शासन, प्रशासन आपल्या पाठीशी आहे, अशी हमी दिली. याप्रसंगी पं. स. सभापती प्रीती शंभरकर, उपसभापती नितीन राऊत, शिवाजी राऊत, जि. प. सदस्य पल्लवी लाडे आदींसह पं. स. चे सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
सुयोग्य व्यवस्थापनाने मूल्यांकन समितीही थक्क
By admin | Updated: January 28, 2015 23:32 IST