सी. ए. केळकर यांचे प्रतिपादन : देसाईगंज वनकर्मचारी संस्थेला द्वितीय पुरस्कारगडचिरोली : सहकार क्षेत्रात अलिकडे फार मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. सहकारी पतसंस्थांना राष्ट्रीयकृत बँकांसोबतही स्पर्धा करावी लागते. या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर पतसंस्थेचा दर्जा व विश्वसनियता टिकवून ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन चार्टर्ड अकाऊंटन्ट सी. ए. केळकर यांनी केले. गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघ यांच्या वतीने सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी सस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेच्या पतसंस्थेला मिळाला. तालुकास्तरावरील द्वितीय पुरस्कार देसाईगंज येथील वनकर्मचारी सहकारी पतसंस्थेला देण्यात आला. सदर पुरस्कार पतसंस्थेचे संचालक संजय मैंद, गाजी शेख, शैलेश करोळकर, तामसटवार, व्यवस्थापक अमोल पायदाडे, रमेश घुटके, नागोसे यांनी स्वीकारला. यावेळी प्रा. शेषराव येलेकर, माजी प्राचार्य खुशाल वाघरे, एस. व्ही. दुमपट्टीवार, बिश्वास आदी मान्यवर उपस्थित होते. केळकर यांनी मार्गदर्शन करताना इन्कम टॅक्स भरताना पतसंस्थेच्या संचालकांनी कोणती काळजी घ्यावी, आपल्या संस्थेचा टाळेबंद उत्कृष्ट करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, आॅडीट कशा पध्दतीने करावे, इलेक्ट्रॉनिक्स डाटा प्रोसेसींग आॅडीट कशा पध्दतीने करावे, याबाबत मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या कार्यशाळेला सहकारी संस्थांचे शेकडो पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
स्पर्धेत टिकण्यासाठी संस्थांचा दर्जा वाढवा
By admin | Updated: February 20, 2017 00:37 IST