कोरची : भारनियमन व वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात कोरची येथील मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तालुक्यातील विजेच्या संबंधित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदारांना युवाशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाव्दारे यावेळी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात कोरचीचे ११ केव्ही. फिडर वेगळे करण्यात यावे, जिल्हा भारनियमन मुक्त करून तालुक्यातील भारनियमन बंद करावे, कोरची तालुक्यातील सबस्टेशनमधील रिक्त पदे तत्काळ भरावे, विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने ३ ते ४ दिवस लोटूनही विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे अनेक कामकाज ठप्प पडतात. उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थित राहत नाहीत व नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखलही घेत नाही. याकडे लक्ष द्यावे, सहाय्यक अभियंत्याच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तालुक्यातील ग्राहकांना अजुनपर्यंत वीज कनेक्शन देण्यात आले नाही. दोन वर्षापासून अनेकांना वीज बिलही मिळत नाही. त्यामुळे वीज बिल देण्यात यावे, कोटगूल क्षेत्रातील नागरिकांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागते. त्यामुळे ३३ के व्ही. कोरची ते कोटगुल लाईन त्वरित सुरू करावी, ट्री कटींग पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावी, कुरखेडाकडून जाणारी ३३ केव्ही लाईन पूर्ण झाली असून ती त्वरित सुरू करावी, बिजेपार येथे ४ ते ५ महिन्यापूर्वी ट्रान्सफार्मर देण्यात आले. परंतु नागरिकांना अजुनपर्यंत डिमांड देण्यात आले नाही. त्यामुळे त्वरित डिमांड द्यावे, कोरची तालुक्यातील रिक्त पदे त्वरित भरावीत, शेतकऱ्यांना कृषी वीज कनेक्शन त्वरित द्यावे, ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन देतेवेळी रिपोर्टविषयी आवश्यक सूचना लावाव्या, मागील ३ वर्षापासून रखडलेले मेंटनंस व काढलेल्या कंत्राटातील इस्टीमेट त्वरीत तयार करावे, विद्युत खांबावर बेरोजगार युवकांना चढविले जाते. यासाठी जबाबदार कुणाला धरायचे या विषयी प्रशासनाने विचार करावा, मीटरचे रिडींग करतांना अतिरिक्त बिल आकारले जातात. अतिरिक्त बिल नागरिकांना देऊ नये, रोहित्र नादुरूस्त झाल्यास तालुक्यातील नागरिक दोन ते तीन महिने अंधारात राहतात. त्यामुळे उपविभागात अतिरिक्त रोहित्र उपलब्ध करून द्यावे, तालुक्यातील गावातील टोलींवर वाढीव विद्युत खांबांची अजुनपर्यंत व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे विद्युत खांबांची व्यवस्था करावी आदींचा समावेश होता. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवाशक्तीचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, चांगदेव फाये, अशोक गावतुरे, नासिर भामानी, सुनंदा आतला, पद्माकर मानकर, अरूण नायक, गोविंदराव दरवडे, शालिनी आंदे, निजाम साय काटेंगे, भिमराव भैसारे, गुड्डू अग्रवाल यांनी दिला आहे.
विद्युत कार्यालयावर धडक
By admin | Updated: June 23, 2014 23:51 IST