कारवाईची मागणी : भिकारमौशीचे शिक्षक पोहोचले ८ वाजतागडचिरोली : तालुक्यातील भिकारमौशी शाळेला प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांनी शनिवारी सकाळी ७.२० वाजता भेट दिली असता, या शाळेतील दोन्ही शिक्षक अनुपस्थितीत होते. परिणामी शिक्षणाधिकाऱ्यांना स्वत: विद्यार्थ्यांची प्रार्थना घ्यावी लागली. शनिवारी सकाळची शाळा राहते. शिक्षण विभागाच्या नियमानुसार सकाळची शाळा असतेवेळी ७ वाजता शाळा उघडणे आवश्यक आहे. ७.१५ वाजेपर्यंत प्रार्थना व परिपाठ आटोपून जवळपास ७ वाजून २० मिनिटांनी अध्यापनाच्या कामास सुरूवात होणे आवश्यक आहे. मात्र भिकारमौशी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कुनघाडकर व शिवनकर हे दोघेही शाळेमध्ये ७ वाजून ५० मिनिटांनी पोहोचले. शिक्षणाधिकारी ७.२० वाजता शाळेमध्ये पोहोचले. तेव्हा विद्यार्थी इकडेतिकडे फिरत होते. सर्व विद्यार्थ्यांना एकत्र गोळा करून प्रार्थना घेतली. त्याचबरोबर सर्वच विद्यार्थ्यांची हजेरी सुध्दा घेतली. विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली दिसून आली.भिकारमौशी येथील दोन्ही शिक्षक नेहमीच उशीरा येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. याबाबतची तक्रार गावातील काही नागरिकांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता, नागरिकांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे दिसून आले. दोन्ही शिक्षक तब्बल ७ वाजून ५० मिनिटांनी शाळेमध्ये पोहोचले. या दोन्ही शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुध्दा गावातील नागरिकांनी शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांच्याकडे केली आहे. जिल्हास्थळापासून अवघ्या १० ते १५ किमी अंतरावर शाळा असूनही हे दोन्ही शिक्षक नेहमीच उशीरा येत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले.
शिक्षणाधिकाऱ्यांना घ्यावी लागली विद्यार्थ्यांची प्रार्थना
By admin | Updated: September 18, 2016 01:56 IST