२४ पदे रिक्त : सिरोंचा, वांगेपल्ली निवासी शाळेत शिक्षणाची ऐसीतैसीगडचिरोली : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जातीमधील हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या कुटुंबातील मुलांना निवासी राहून शिक्षण घेता यावे, याकरिता राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने दोन वर्षापूर्वी सिरोंचा व अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथे निवासी शाळा सुरू करण्यात आली. मात्र या दोनही शाळेत शिक्षकांसह एकुण २४ पदे रिक्त आहेत. तसेच वांगेपल्लीच्या निवासी शाळेत गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे धुळखात पडले आहेत. बायोमेट्रीक प्रणालीही फेल आहे. यामुळे या दोनही शाळेत शिक्षणाच्या आयचा घो! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २९ जून २०११ च्या शासन निर्णयान्वये राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुला- मुलींच्या शिक्षणाकरीता प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यापैकी ३५३ शासकीय निवासी शाळा प्रथम टप्प्यात राज्यातील १०० तालुक्यात सुरू करण्यासाठी शासनाने मंजूरी प्रदान केली आहे. सद्यास्थितीत राज्यभरात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुला- मुलींसाठी ६४ निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या निवासी शाळेमध्ये जून २०११ पासून इयत्ता ५ ते ७ वीचे सेमि इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ८ वी व त्यानंतर नैसर्गिक वाढीनुसार इयत्ता ८ व १० वा वर्ग सुरू करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास, ग्रंथालयीन सुविधा व इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा विभागाने केला आहे. गडचिरोली या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त दुर्गम जिल्ह्यात समाजकल्याण विभागाने सिरोंचा तालुका मुख्यालयी व अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथे निवासी शाळा सुरू करण्यात आली. वांगेपल्ली येथील मुलांच्या निवासी शाळेत सद्या इयत्ता ६ ते १० वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या शाळेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असे एकुण १६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विभागाने २ वर्षापूर्वी या शाळेकरिता प्रशस्त शासकीय इमारत उभारली. या निवासी शाळेतसुद्धा ११ कर्मचारी कार्यरत आहेत. या शाळेमध्ये एकुणण् ११ पदे मंजूर आहेत. मात्र गेल्या २ वर्षापासून या शाळेतील तब्बल ८ पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे या शाळेतील शिक्षणावर परिणाम होत आहे. या शाळेमध्ये एका खासगी कंपनीने ७ ते ८ महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे आणून टाकले. या कॅमेरासाठी शासनाचे लाखो रूपये खर्च झाले. मात्र सदर सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही लावण्यात आले नाही. पुरविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे धुळखात पडले आहेत. या शाळेतील बायोमेट्रीक प्रणालीमध्येही बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे या शाळेतील शैक्षणिक प्रक्रियेवर, कारभारावर तसेच विद्यार्थ्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. सिरोंचा येथील निवासी शाळेत इयत्ता ६ ते ८ वीपर्र्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. या शाळेत एकुण १९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ मुख्याध्यापक, लिपीक, शिपाई आदी तिनच पदे भरण्यात आली आहेत. या शाळेमध्ये तब्बल १६ पदे रिक्त आहेत. या शाळेमध्ये सध्या ६ ते ८ वीपर्यंतच्या वर्गाचे ११५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेमध्ये शिक्षकांची वाणवा असल्याने या शाळेमध्ये शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. या शाळेकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शिक्षणाच्या आयचा घो !
By admin | Updated: October 12, 2014 23:32 IST