लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दूषित पाण्यापासून तयार केलेल्या बर्फामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता असते. जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यांत बर्फाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अनेकजण अखाद्य बर्फाचा वापर खाद्याचा बर्फ म्हणून करतात. त्यामुळे आइसगोळ्यात कूलिंगचा बर्फ तर नाही ना? याबाबत खात्री करूनच बर्फ खावे, अन्यथा आरोग्याच्या दृष्टीने ते महागात पडू शकते.
उन्हाळा सुरू झाल्याने सध्या सर्वत्र आइस गोळ्याचे ठेले लागले आहेत. आकर्षित करणारे स्वरूप आणि भुरळ पाडणाऱ्या गोडव्यामुळे खवय्यांच्या उड्या पडत असल्याने वाट्टेल त्या किमतीत हे आइस गोळे विकले जात आहेत. सध्या आइस गोळा हा जणू ट्रेंडच झाला आहे. मात्र, हा आइस गोळा नसून विषाचाच गोळा आहे. कारण, या गोळ्यात वापरला जाणार कुठलाही बर्फ खाण्या योग्य नसून, तो औद्योगिक वापराचा आहे. खाद्यपदार्थ तपासणीच्या कोणत्याही प्रक्रियेतून न जाता, तो थेट खवय्यांच्याच गळ्याला लागत आहे. आइस गोळ्यांच्या सर्रास विक्रीचा हा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने भीतीचा गोळा आणण्याचाच प्रकार आहे.
तीन महिन्यांत १२ नमुनेगत तीन महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने बर्फाचे १२ नमुने घेण्यात आलेले आहेत. सदर नमुने तपासले असता ते प्रमाणित आढलेले आहेत. बर्फगोळ्याला रंग तर दिलाच जातो. शिवाय गोळा चवदार लागावा यासाठी आर्टिफिशियल फ्लेवरचा वापरही केला जातो.
लादीचा बर्फ अस्वच्छ; आइसक्यूब उत्तमलादीचा बर्फ हा अस्वच्छ पाण्याने तयार केलेला व तो अस्वच्छसुद्धा असतो. मात्र, आइसक्युब हा उत्तम असतो. आइसक्युबचा बर्फ आहे की नाही, याबाबत खात्री करावी.
आइसगोळा खाण्यापासून मुलांना रोखाशहरासह गावखेड्यांतही मोठ्या प्रमाणात आइसगोळा खाण्याचा ट्रेंड उन्हाळ्यात पसरतो. हा गोळा शुद्ध पाण्यापासूनच तयार केला असेल याची शाश्वती नाही. त्यामुळे आइसगोळा मुलांना खाऊ देऊ नये.
पांढरा बर्फ खाण्याचा; निळा बर्फ वापराचापांढरा बर्फ खाण्यासाठी वापरला जातो, तर निळा बर्फ औद्योगिक क्षेत्रात कूलिंगसाठी वापरला जातो. या माध्यमातून बर्फाची ओळख केली जाते.
सरबत, आइसगोळ्याच्या रंगांची मोहिनी !सरबत व आइसगोळ्याला विविध प्रकारचा रंग मिसळलेला असतो. हा रंग आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरतो.
"मार्कंडादेव यात्रेपासूनच बर्फ तपासणीची मोहीम तीव्र केलेली आहे. ज्या ठिकाणी संशय येतो किंवा तक्रारी येतात, तेथील तपासणी केली जाते."- सुरेश तोरेम, अन्न सुरक्षा अधिकारी