नगरम घाटावरील परिस्थिती : ६० कुटुंबांवर ओढावले संकटसिरोंचा : महाराष्ट्र-तेलंगण सीमेला जोडणाऱ्या गोदावरील नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. येथून कच्चा पूल सुरू झाल्याने सर्व प्रवासी कन्नेपल्ली मार्गाने महाकालेश्वरकडे रवाना होतात. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील नगरम नदीघाटावरील डोंगा वाहतुकीचा प्रवास मागील तीन महिन्यांपासून बंद झाला आहे. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित ६० कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे. ५० वर्षांपूर्वीपासून सिरोंचा तालुक्यात डोंगा वाहतूक अनेक घाटावरून केली जाते. नगरम नदीघाटावरून आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यात प्रवासी डोंग्यानेच नदी पार करून जात होते. नगरम नदीघाटावर ६० कुटुंबाचा उदरनिर्वाह डोंगा वाहतुकीवर अवलंबून होता. गोदावरी नदीच्या पुलाजवळ कच्चा रस्ता उभारण्यात आल्याने ही डोंगा वाहतूक बंद झाली. नगरम ते कालेश्वर हे दोन ते तीन किमी अंतर नदीतून डोंग्याद्वारे प्रवास करून पार पाडले जात होते. बाराही महिने ही वाहतूक सुरू राहायची. दररोज डोंग्याच्या कमाईतून कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळत होते. आता ही वाहतूक बंद होऊन गोदावरी नदीजवळून अवैधरीत्या पूल कामाजवळ डोंगा वाहतूक सुरू झाली व रविवारी दुर्घटना घडली. नगरम घाटाजवळील नावाडी व एक दिवसासाठी १२ लोकांची जबाबदारी असे नियोजन होते. परंतु आता हे सर्व लोक बेरोजगार झाल्याने दुसऱ्या कामासाठी त्यांना गाव व नदीघाट सोडून जावे लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
डोंगा वाहतूक बंद झाल्याने नावाडी कुटुंब अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 01:49 IST