गडचिरोली : अवघ्या एक दिवसावर दिवाळी आल्याने शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली असून बाजारात ग्राहकांची तोबा गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. कोणताही सण असो नागरिक घराबाहेर पडून विविध वस्तूंची खरेदी हमखास करतात. मग आता दिवाळीसारखा सण असल्याने दिवाळीची खरेदी गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्हाभरात जोरात सुरू आहे.बाजारात नवनवीन दिवे विक्रीला आले आहेत. त्यात आता फॅन्सी दिव्यांची मागणी जोरात आहे. बाजारात विविध प्रकारचे दिवे, कपडे, मिठाई, फटाके, रांगोळ्या विक्रीला आल्या आहेत. दिवाळीच्या सणात विशेषत: लहान-मोठ्या आकाश दिव्यांनी आसमंत उजळलेला असतो. बाजारपेठेत आकाश दिवे, कंदील, पताका, तोरण, झुंबर, फॅन्सी दिवे, साधे दिवे, रंगीबेरंगी रांगोळ्या व विविध आकारातील पणत्या विक्रीकरिता उपलब्ध आहेत. आकाश दिव्यांच्या किंमती ५० रूपयापासून ते १२०० रूपयापर्यंत आहे. महिलांचा कल आर्टीफिसीअल दिवे खरेदी करण्याकडे जास्त असल्याचे यंदा दिसून येत आहे. दिव्यांच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारात गर्दी केली असल्याचेही दिसून येत आहे. कपड्यांच्या दुकानातही चांगलीच गर्दी पाहावयास मिळत आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत विविध प्रकारचे फॅन्सी तसेच लखनवी कपडे खरेदी करतांना ग्राहक दिसून येत आहे. यात प्रामुख्याने लहान मुले व तरूणांची गर्दी पाहावयास मिळत आहे. मिठाईच्या दुकानात खवय्यांची गर्दी होत असून मिठाईत काजू कतली, मिल्क केक, बदाम पिस्ता, मथुरा पेढा, डोडा बर्फी, गुलकंद केक, दिल खुशाल पेढा, मलाई, बर्फी, मावा बर्फी, अंजीर केक, काजु शेक, चॉकलेट बर्फी, कश्मिरी कलाकंद, काजू, सोनपापडी आदी प्रकारच्या मिठाया बाजारपेठेत उपलब्ध आहेत. शहरात ठिकठिकाणी सुकामेवा व ड्रायफुट्सची दुकाने सजली आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारचे फुलेही विक्रीला आले असून ही फुले ग्राहकांची मने मोहून घेत आहेत. फुलांमध्ये झेंडूची पिवळी, लाल, नारंगी फुलांचा समावेश आहे. दिवाळी सणानिमित्त सध्या फुलांच्या किंमतीही वाढल्या आहेत. याशिवाय बाजारपेठेत फटाक्याचेही दुकाने सजली आहेत. या दुकानामध्ये विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सराफा दुकानातही ग्राहकांची गर्दी होत आहे. फळांची दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत. दिवाळी सणामध्ये फराळाला महत्व आहे. या फराळाची खरेदी बाजारातून करता येते. रेडीमेड फराळ बाजारात उपलब्ध आहेत.
दिवाळीनिमित्त बाजारपेठेत उसळली गर्दी
By admin | Updated: October 20, 2014 23:11 IST