गडचिरोली : जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी १०० च्यावर दुग्ध विकास सहकारी संस्था स्थापन करून त्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. मात्र सध्य:स्थितीत यापैकी केवळ ७ ते ८ संस्था सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात धवलक्रांती निर्माण होण्याचे केवळ एक स्वप्नच ठरले असल्याची टीका होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे फार कमी साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिक शेतीचाच व्यवसाय करतात. शेती व्यवसायाला दुधाचा चांगला जोड व्यवसाय होऊ शकतो. या उद्देशातून दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दुग्ध विकास सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. या शेतकऱ्यांना अनुदानावर दुधाळ जणावरांचे वाटप करण्यात आले. मात्र पशुसंवर्धन तसेच दुग्ध विकास विभागाने सदर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले नाही. त्यामुळे सदर जनावरे काही दिवसातच मृत्यूमुखी पडले. त्याचबरोबर दुधाचे प्रमाणही कमी झाले. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले दुध जास्त काळ टिकावे यासाठी कनेरी येथे शीतकेंद्र स्थापन करण्यात आले. मात्र सदर शीतकेंद्र सुद्धा औटघटकेचेच ठरले. जिल्ह्यात केवळ ७ ते ८ सहकारी संस्था सुरू असून त्यांच्याकडील दुध खरेदी करून नागभिड येथील शीतकरण केंद्रात पाठविले जाते. गडचिरोली जिल्ह्याच्या दुधाची गरज खासगी कंपन्यांकडून भागवावी लागत आहे. खासगी कंपन्या अव्वाच्या सव्वा किंमतीत दुधाची विक्री करीत आहेत. कधीकधी दुधाचा दर्जाही सुमार राहतो. मात्र नाईलाजास्तव ग्राहकांना दुध खरेदी करावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल, यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून मागील काही दिवसांपासून केली जात आहे.
धवलक्रांती ठरले शेतकऱ्यांसाठी स्वप्नच
By admin | Updated: October 16, 2014 23:25 IST