अहेरी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी अहेरी तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या दोडेपल्ली गावात धाड टाकून चितळाचे चार किलो मांस व अवजारांसह एका आरोपीला अटक केल्याची घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.आनंदराव कचमा तोरेम रा. दोडेपल्ली असे शिकारी आरोपीचे नाव आहे. चितळाची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावली जात असल्याची गुप्त माहिती मिळताच रामपूर बिटाचे वनरक्षक, आर. एस. मडावी, प्रक्षेत्र सहायक पी. एस. घुटे, जी. एल. नवघरे, सी. व्ही. सडमेक, एस. एस. गुरूनुले, खमनचेरूचे क्षेत्र सहायक कुमरे, सिडाम, वासेकर, लांजेवार व कर्मचाऱ्यांनी दोडेपल्ली गावात जाऊन आनंदराव तोरेम याच्या घरी धाड टाकली. यावेळी त्यांना चार किलो चितळाचा मांस आढळून आला. यापैकी अर्धा शिजविलेला व अर्धा कच्च्या स्वरूपात होता. वनकर्मचाऱ्यांनी तोरेम याला मांस व कुऱ्हाड, सुरा या अवजारांसह ताब्यात घेतले. या शिकार प्रकरणात आणखी पाच आरोपींचा समावेश आहे, अशी शक्यता अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. एस. आत्राम यांनी व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोडेपल्लीत चितळाचे मांस व अवजारांसह एकाला अटक
By admin | Updated: March 8, 2016 01:22 IST