निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या सूचना : जि.प. व पं.स. निवडणूक तयारीचा घेतला आढावा गडचिरोली : राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडावयाच्या आहेत. निवडणूक आयोग या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. कोणत्याही सत्ताधारी अथवा विरोधी पक्षांनी बेकायदेशीर काम करायला दबाव आणला तरी त्यांच्या दबावाखाली येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काम करू नये, प्रसंगी एफआयआर दाखल करावा, अशा स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिल्या. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे जि.प. व पं.स.च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शैलेंद्र मेश्राम, उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे अतिरिक्त सीईओ विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश गायकवाड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आयुक्त सहारिया म्हणाले, मतदार जागृतीसाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवावे, अपंग मतदारांना सोयी, सुविधा पुरावाव्यात, अतिसंवेदन क्षेत्रात संरक्षण द्यावे, असे ते म्हणाले. या विषयांची जाणून घेतली तपशीलवार माहिती नामनिर्देशन छाननीबाबत जिल्हा न्यायालयात प्रलंबित अपिलांची माहिती, उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे वेबसाईटवर उपलब्ध आहेत किंवा कसे, मतपत्रिकेवरील उमेदवारांची नावे छापावयाच्या फॉन्टसाईजमध्ये वाढ करणे, मतदान केंद्राची तपासणी, अतिसंवेदनशील केंद्राची निश्चिती, मूलभूत सुविधा, मतदान केंद्रांसमोर उमेदवारांच्या शपथपत्रामधील तपशीलवार गोषवारा छापई, ईव्हीएम व इतर साहित्याची कमरता, मतदार स्लीप छपाई व वाटप, बुथ मॅपींग, उमेदवार खर्चाचा हिशोब आदी बाबींची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली.
कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली काम करू नका!
By admin | Updated: February 11, 2017 01:48 IST