अनोखी भेट : अतिदुर्गम मिरकल गावात हेल्पिंग हॅन्ड्स अहेरीचा पुढाकारअहेरी : तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त मिरकल गावात हेल्पिंग हँड्स अहेरी या संस्थेतर्फे गरीब व गरजू आदिवासी नागरिकांना दिवाळी फराळासह विविध वस्तूंचे वितरण दिवाळीच्या निमित्ताने शुक्रवारी करण्यात आले. दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आदिवासींना मदतीचा हात देण्यात संस्थेने महत्त्वाचा वाटा उचलला. नक्षलग्रस्त आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवनात दिवाळीच्या निमित्ताने का होईना, प्रकाशाप्रमाणे आनंद तेजोमय व्हावा, या उद्देशाने अहेरी येथील हेल्पिंग हॅन्डस सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी फराळ व बालकांना कपड्यांचे वितरण करण्यात आले.मिरकल गावात जाण्यासाठी रस्ता नाही व विद्युतचाही अभाव आहे. शिक्षणापासून वंचित व नक्षली सावटात पिचलेल्या आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची एरव्ही भीती असते. पोलीस दलातर्फे अशा भागात जनजागृती करण्याकरिता मेळावे आयोजित केले जातात. परंतु दुर्गम भागातील अनेक गावात पोलीस विभाग पोहोचू शकत नाही. वंचित व मागास असलेल्या अशा गावातील आदिवासी बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने का होईना मदत करण्याच्या हेतूने अहेरी येथील हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेच्या वतीने दुर्गम व नक्षलग्रस्त मिरकल येथील ६० कुटुंबांना दिवाळी फराळाचे वितरण करण्यात आले. त्यांच्या समवेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गरिबांची दिवाळी साजरी केली. यावेळी गावातील महिला, पुरुष, बालगोपाल, युवक, युवती उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या वस्तू व फराळ पाहून सर्वच नागरिकांनी खूप आनंद व्यक्त केला. सर्वांनी एकत्रितरीत्या दिवाळी साजरी केल्याने लहान चिमुकल्यांनीही खूप आनंद लूटला. याआधी असा उपक्रम गावात कधीच झाला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगत संस्थेच्या उपक्रमाची स्तुती केली व समाधान व्यक्त केले. कधीकधी आर्थिक अडचणीमुळे त्यांना सण साजरा करता येत नाही. मात्र या वर्षी मिरकल गावात गरिबांची दिवाळी उपक्रम राबविल्याने मिरकलवासीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यामुळे संस्थेच्या उपक्रमाचे सार्थक झाले, असे उद्गार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काढले. या उपक्रमासाठी हेल्पिंग हँड्स चे अध्यक्ष प्रतीक मुधोळकर, अक्षय येन्नमवार, पप्पू मद्दिवार, धनंजय मंथनवार, अक्षय मंथनवार, मयूर गुम्मलवार, अनुराग बेझलवार, गौरव तेलंग, अमोल वडनेरवार, सुमित पारेल्लीवार, विनोद सुंकरी, संदीप बोम्मावारसह इतर युवकांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
६० गरीब कुटुंबांना दिला दिवाळीचा फराळ
By admin | Updated: November 15, 2015 00:57 IST