समाधान शिबिर : महसूल विभागाचा उपक्रम; योजनांची दिली माहितीआष्टी : महसूल विभागाच्या वतीने आष्टी येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात महाराजस्व अभियानाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या शिबिरादरम्यान नागरिकांना ८२२ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. राजस्व अभियानाचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे होते. प्रमुख अतिथी महणून सरपंच वर्षा देशमुख, जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, चामोर्शी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी बादलशाह मडावी, वनपरिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे, नायब तहसीलदार चडगुलवार, व्ही. एम. दहिकर, गवळी, उपसरपंच नंदा डोर्लीकर, प्राचार्य खराती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक वाढई आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराला आष्टी, अनखोडा, कोनसरी, गणपूर, कुनघाडा (माल), मार्र्कंडा (कं.) या गावातील नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या मार्फतीने उत्पन्न प्रमाणपत्र, रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. सेतू केंद्राच्या मार्फतीने २० अधिवास प्रमाणपत्र, २२ जातीचे दाखले, १३ नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, २ जन्म-मृत्यू दाखले आदी ८२८ दाखल्यांचे वितरण या शिबिरादरम्यान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. डॉ. देवराव होळी म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना ५० किमी अंतरावर असलेल्या तालुकास्थळी जाऊन दाखले घ्यावे लागत होते. यामध्ये वेळ, पैसा, श्रम वाया जात होता. दाखल्याअभावी नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महसूल विभागाने या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे यांनीसुद्धा नागरिकांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
आष्टी येथील शिबिरात ८२२ दाखल्यांचे वितरण
By admin | Updated: January 11, 2016 01:27 IST