दिलीप दहेलकर गडचिरोलीदलित वस्ती पाणीपुरवठा योजनेंतर्गत स्थानिक नगर पालिकेच्या वतीने सन २०११-१२ या वर्षात कॉम्प्लेक्स-विसापूर भागात नळ पुरवठा पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आले. या कामावर आतापर्यंत साडेनऊ लाख रूपये खर्च झाले आहेत. मात्र सुरू असलेल्या मुख्य पाईपलाईनला नव्याने टाकण्यात आलेली पाईपलाईन जोडण्यात आली नाही. तसेच पाईपलाईन टाकण्याचे काम अपूर्णच आहे. परिणामी या भागातील जवळपास ४० कुटुंब दोन वर्षानंतरही तहानलेलेच असल्याचे विदारक वास्तव ‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरूवारी या भागाला भेट दिल्यानंतर समोर आले.स्थानिक नगर पालिका प्रशासनाला दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याची सोय करण्यासाठी दरवर्षी १२ लाख रूपयांचा निधी मिळतो. या निधीतून नगर पालिका प्रशासन शहरातील दलित वस्ती असलेल्या वार्डांमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम प्रस्तावित करते. कॉम्प्लेक्स-विसापूर भागातील दलित वस्तीतील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने सन २०११-१२ या वर्षात १२ लाखांचे पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर केले. पालिकेने ६ फेब्रुवारी २०१३ रोजी या कामाच्या कंत्राटदाराकडून निविदा मागितल्या. निविदा प्रक्रिया पूर्ण करून नागपूरच्या एका कंत्राटदाराला कॉम्प्लेक्स भागातील जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूलच्या समोरील वस्तीमधील पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे आदेश ६ मार्च २०१३ रोजी दिले. या कंत्राटदाराने पाईपलाईन टाकण्याचे काम संथगतीने सुरू केले. सदर काम परवडत नसल्याच्या कारणावरून नागपूरच्या कंत्राटदाराने सदर काम बंद पाडले. त्यानंतर याच कंत्राटदाराच्या नावाने गडचिरोली शहरातील एका कंत्राटदाराने काम हाती घेतले. मात्र या कंत्राटदाराने काम सोडून दिले. दिवाळीपूर्वीच्या कालावधीत सदर काम पूर्णत: थंडबस्त्यात होते. त्यानंतर ज्याच्या नावाने कंत्राट आहे त्याच मूळ कंत्राटदाराने सदर काम पुन्हा सुरू केले. गेल्या १५ दिवसांपूर्वीपासून पाईपलाईन टाकण्याच्या कामात थोडी गती आली आहे. मात्र सदर काम अपूर्णच आहे. पालिका प्रशासनाने या कामाच्या कंत्राटदाराला १२ एप्रिल २०१३ रोजी चार लाख रूपये अदा केले. त्यानंतर १७ जुलै २०१३ रोजी दोन लाख व ३० एप्रिल २०१४ रोजी दोन लाख ४३ हजार रूपयांचा बिल अदा केले आहे. या कामावर आतापर्यंत साडेनऊ लाख रूपये खर्च झाले असल्याची माहिती पालिकेच्या प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे. निधी खर्च होऊनही कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे व पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या कंत्राटदाराने नवीन टाकलेल्या पाईपलाईनला सुरू असलेल्या मुख्य पाईपलाईनला अद्यापही जोडली नाही. त्यामुळे कॉम्प्लेक्स भागातील जवळपास ४० कुटुंब नळ पाणीपुरवठ्यापासून वंचित असल्याचे दिसून येते.विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने महिलांची पंचाईतकॉम्प्लेक्स भागातील जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल परिसरातील जवळपास ३५ ते ४० कुटुंबांसाठी नगर पालिकेच्या वतीने १२ लाख रूपयांच्या निधीतून नळ पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर करण्यात आले. मात्र सदर काम अपूर्ण स्थितीत असून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. या भागातील कुटुंबांकडे घरी विहीर आहे. मात्र प्रचंड उष्णतामानामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे नागरिकांना अपुरे पाणी मिळत आहे. नळ पाणीपुरवठ्याअभावी महिलांची पाण्यासाठी पंचाईत होत आहे.कॉम्प्लेक्स भागातील दलित वस्तीतील नळ पाईपलाईन टाकण्याचे काम करारनामा केलेल्या जुन्याच कंत्राटदाराकडून सुरू आहे. बरेचशे काम झाले आहे. नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचे काम येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण करून मुख्य पाईपलाईनला जोडण्यात येईल. त्यानंतर लगेच पाणीपुरवठा सुरू होईल. सात-आठ दिवसात या भागातील नागरिकांना पाणी मिळेल.- गिरीष बन्नोरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली
विसापूर वार्डातील विदारक वास्तव : साडेनऊ लाख खर्च करूनही ४० कुटुंब तहानलेलेच
By admin | Updated: May 22, 2015 01:40 IST