घटनास्थळाची पाहणी : सुरेश तेलामीच्या कुटुंबासोबत चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी गुरूवारी भामरागड येथील हेमलकसा ते कारमपल्ली रस्त्यावर ३ मे रोजी झालेल्या भू-सुरूंग स्फोटातील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पोलीस महासंचालक माथूर यांनी ३ मे रोजी घडलेल्या घटनांचा सविस्तर आढावा घेतला. नक्षल्यांविरूध्द राबविण्यात येणाऱ्या रणनीतीमध्ये आणखी काय सुधारणा करता येतील याबाबत उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ३ मे रोजी भू-सुरूंग हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस शिपाई सुरेश लिंगा तेलामी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शहीद वीर पत्नी झिनत तेलामी यांना तीन लाख रूपयांची तत्काळ आर्थिक मदतही पोलीस महासंचालक माथूर यांनी दिली. उर्वरित मदत व योजनांचा लाभ देण्यासाठी आपण प्रयत्न करू, पोलीस विभाग तेलामी यांच्या कुटुंबियांना नेहमीच मदत करेल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी माथूर यांनी भामरागड पोलीस ठाण्याला भेट देवून पाहणी केली. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संदीप कर्णीक, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी ए. राजा उपस्थित होते.
पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षेचा आढावा
By admin | Updated: May 13, 2017 02:03 IST