गडचिरोली : भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा येथे ११ डिसेंबर रोजी नव्याने स्थापन केलेल्या पोलिस मदत केंद्रास १७ डिसेंबरला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस मदत केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली व उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले.
अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना , राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल , पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जनजागरण मेळावा झाला. यात शेतकऱ्यांना फवारणी यंत्र, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लॅंकेट, लोवर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, दप्तर, क्रिकेट कीट, व्हॉलिबॉल व नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील एक हजारहून अधिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
जवानांना एक लाखांचे बक्षीसपेनगुंडा हे अतिदुर्गम गाव आहे. छत्तीसगडची सीमा तेथून केवळ तीन किलोमीटरवर आहे. घनदाट जंगलात जवानांनी मोठ्या मेहनतीने अवघ्या २४ तासांत पोलिस मदत केंद्र सुरु केले. कडाक्याच्या थंडीत हे जवान येथे सध्या खडतर परिस्थितीत राहत आहेत. या जवानांच्या अडीअडचणी जाणून घेत पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक लाखांचे बक्षीस जाहीर केले.
माओवादविरोधी लढ्यात साथ द्या...पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्थानिकांशीही संवाद साधला. त्या म्हणाल्या, नवीन पोलिस मदत केंद्राच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्या जाईल . विविध शासकीय योजनांचा तसेच पोलिस दलाच्या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी प्रगतीकडे पाऊल टाकावे. येथे रस्ते, आरोग्यसेवा आदी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. माओवादविरुध्द लढ्यात साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.