घोट : मंदिरात रांग लावण्यापेक्षा वाचनालयाकडे वळून तळागाळातील माणसाला सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल तर साक्षरतेचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे साक्षर होऊन स्वत:चा व देशाचा विकास घडविता येऊ शकतो, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील पेटतळा येथील संस्कार बालसदन निराधार अनाथ बालकांच्या इमारत बांधकामाकरिता निधीसाठी जिल्हा परिषद शाळेत समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना कीर्तनकार सत्यपाल महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपरामजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश उपाध्ये होते. प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, सरपंच बाळा येनगंटीवार, लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष अंनिस परपिल्ली, प्राचार्य विनय चव्हाण, गिरीश उपाध्ये, बोडे, तिडके, उमाजी कुद्रपवार आदी उपस्थित होते.सत्यपाल महाराज म्हणाले की, अंधश्रद्धा, दारूच्या व्यसनामुळे समाजाची अधोगती होत आहे. वाईट गोष्टीकडे पैसा खर्च करण्यापेक्षा घरी शौचालय तयार करा, भ्रष्टाचार समाजातील कीड असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना थोर पुरुषांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचे ग्रामगीतेच्या माध्यमातून आचरण झाले पाहिजे. प्रास्ताविक गिरीजाशंकर उपाध्ये, संचालन विजय कारखेले तर आभार भारती उपाध्ये यांनी मानले. (वार्ताहर)
साक्षर होऊन समाजाचा विकास घडवा
By admin | Updated: May 7, 2015 01:16 IST