लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धार्मिक कार्यक्रमातून माणसाला मन:शांती लाभत असते. आत्मिक व मानसिक शक्ती मिळते. त्यामुळे भाविक मंदिर देवस्थानात जाऊन पूजाअर्चा करीत असतात. मात्र कोरोनाच्या संचारबंदीने मंदिर व देवस्थानाचीेही दारे बंद झाली आहेत. रामनवमीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच मंदिरातील धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. बरीच देवालये कुलूपबंद दिसून येत आहेत.गडचिरोलीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या सेमाना देवस्थान हे भाविकांचे श्रद्धांस्थान आहे. गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील, तालुक्यातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो भाविक सेमाना देवस्थानात येऊन पूजाअर्चा करतात. सामूहिक भोजनावळीचाही कार्यक्रम पार पाडल्या जातो. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे सेमाना देवस्थान परिसरातील सार्वजनिक व खासगी कार्यक्रम पूर्णत: बंद आहेत. रामनवमीच्या दिवशी गुरूवारला काही भाविक दर्शनासाठी आले होते. मात्र मंदिर कुलूपबंद असल्याने बाहेरूनच देवाला नमस्कार करून भाविक घरी परतले. रामनवमी, हनुमान जयंती व प्रत्येक शनिवारी सदर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र कोरोनामुळे यावर्षी रामनवमी व हनुमान जयंतीचे सर्व कार्यक्रम देवस्थान ट्रस्ट समितीने रद्द केले आहे. समितीच्या वतीने तशी सूचना भाविकांनी केली आहे. याबाबतचे फलक प्रवेशद्वारावर लावले आहे.मार्र्कंडादेव, चपराळा, वैरागड, अरततोंडी यांच्यासह सर्वच धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे पर्यटक व भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. भाविक आपापल्या घरी पूजाअर्चा करीत असल्याचे दिसते.वनोद्यानातही शुकशुकाटवनविभागाच्या वतीने सेमाना देवस्थानालगत लाखो रुपये खर्च करून वनोद्यान उभारण्यात आले आहे. या वनोद्यानात लहान मुला, मुलींना खेळण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यात आले आहे. वनौषधीसह इतर रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या या सेमाना उद्यानात शाळकरी मुले, युवक, युवती व नागरिक मोठी गर्दी करीत असतात. मात्र कोरोनाच्या संचारबंदी गेल्या १५ दिवसांपासून या वनोद्यानाची दारे बंद करण्यात आली आहेत. रामनवमीच्या दिवशी या वनोद्यानाकडे एकही नागरिक दिसून आले नाही. कोरोनाचे संकट पूर्णत: दूर झाल्यावरच सेमाना देवस्थान व वनोद्यानात लोकांची गर्दी होणार आहे. सुटीच्या दिवशी शहरातील बरेच लोक या वनोद्यानात जाऊन आनंद घेतात.
जिल्ह्यातील देवस्थाने कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST
गडचिरोलीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या सेमाना देवस्थान हे भाविकांचे श्रद्धांस्थान आहे. गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील, तालुक्यातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो भाविक सेमाना देवस्थानात येऊन पूजाअर्चा करतात. सामूहिक भोजनावळीचाही कार्यक्रम पार पाडल्या जातो. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे सेमाना देवस्थान परिसरातील सार्वजनिक व खासगी कार्यक्रम पूर्णत: बंद आहेत.
जिल्ह्यातील देवस्थाने कुलूपबंद
ठळक मुद्देकोरोनाबंदीचा परिणाम : धार्मिक कार्यक्रम रद्द झाल्याने भाविकही फिरकेना