आष्टी : पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. वातावरणातील बदलामुळे सध्या आष्टी परिसरात मलेरिया व डेंग्यू आजाराची लागण अनेक नागरिकांना झाली असल्याचे दिसून येते. यामुळे आष्टी परिसरातील शासकीय तसेच खासगी रूग्णालये रूग्णांनी हाऊसफूल दिसून येत आहे.आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात विठ्ठलवाडा व परिसरातील डेंग्यूसदृश्य आजाराचे ८ रूग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी ७ रूग्णांवर प्राथमिक उपचार करून या रूग्णांना चंद्रपूरला हलविण्यात आल्याची माहिती आहे. आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. याशिवाय ठाकरी, कुनघाडा, कढोली, इल्लूर, अनखोडा या गावातही मलेरिया आजाराची साथ आली आहे. या गावातील काही रूग्ण ग्रामीण रूग्णालयात तर काही रूग्ण खासगी रूग्णालयात उपचार करीत आहेत. विठ्ठलवाडा येथील रूग्ण डेंग्यूच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. या गावातील रूग्ण आष्टीमध्येच उपचार घेत आहेत. नागरिकांनी डेंग्यूसारख्या आजाराची लागण होऊनही यासाठी आजुबाजुच्या परिसरात स्वच्छता ठेवावी, असे आवाहन ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अमोल धात्रक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
आष्टी परिसरात डेंग्यू व मलेरियाची लागण
By admin | Updated: August 18, 2014 23:29 IST