पूल बांधण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:36 AM2021-02-16T04:36:46+5:302021-02-16T04:36:46+5:30

कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी-सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अरततोंडी ते सती नदीघाट ...

Demand for bridge construction | पूल बांधण्याची मागणी

पूल बांधण्याची मागणी

Next

कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी-सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अरततोंडी ते सती नदीघाट हे अंतर जवळपास दोन किमी आहे.

वन जमिनीवर अतिक्रमण

आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी हाेत आहे.

भामरागड तालुक्यातील गावे लाइनमनअभावी

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठ्याची समस्या आहे.

अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा

आष्टी : संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्यावतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते; मात्र या योजनेची जनजागृती नाही.

गॅस सिलिंडरधारकांना केरोसिनचा पुरवठा करा

आरमोरी : शासनाने बीपीएलधारकांना गॅस सिलिंडरचे वितरण केले आहे; मात्र या बीपीएलधारकांना मिळणारे रॉकेल बंद केल्याने ग्रामीण भागात नागरिकांना फटका बसत आहे. ग्रामीण भागात रॉकेलची गरज सर्वाधिक असते; मात्र शासनाने गॅस देऊन रॉकेल बंद केले आहे.

मानापुरात बायपास रस्ता द्या

मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मानापूर गावातून पिसेवडधाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला नागरिकांनी अतिक्रमण करून अर्धा रस्ता गिळंकृत केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता सिमेंट काँक्रीटची पक्की घरे तयार झाली आहेत. शिवाय संरक्षक भिंतीचे बांधकाम झाल्यामुळे रस्ता अरुंद झाला.

मुख्यालय सक्तीचे करा

जोगीसाखरा : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली; मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. त्यामुळे मुख्यालय सक्तीचे करून उपस्थित न राहणाऱ्यांवर कारवाई करावी.

मुलचेरात डुकरांचा हैदोस

मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत; मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

कव्हरेजअभावी त्रास

अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

पुनर्वसित गावे दुर्लक्षित

देसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावांचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले. किन्हाळा गाव पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित झाले आहे; मात्र अरततोंडी गाव अर्धेअधिक जुन्याच ठिकाणी आहे. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास अडचण आहे.

लाेहारा मार्ग दुरवस्थेत

आरमोरी : तालुक्यातील सिर्सी ते लाेहारा या मार्गावर जागोजागी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने रहदारी करताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गाने बससेवा उपलब्ध आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

खुटगावात निवारा बांधा

धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नवीन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पार्किंगची समस्या भारी

देसाईगंज : मुख्य रहदारीच्या आरमोरी-कुरखेडा मार्गावर वाहनचालक वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे येथील रहदारीस अडथळा होत आहे. शिवाय, त्याचा व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांनाही फार त्रास होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणधारक व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मोकाट जनावरांचा हैदोस

गडचिरोली : दर रविवारी शहरात भरणाऱ्या बाजारात मोकाट गुरांचा हैदोस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. विक्रेत्यांनी ठेवलेल्या भाजीवरही त्यांची नजर चुकवून ताव मारतात. माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करावा.

जीर्ण खांब बदला

देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात अनेक लोखंडी खांब वाकले आहेत. तर काही खालच्या बाजूने जीर्ण झाले आहेत. ते खांब कधीही कोसळण्याचा धोका आहे. ते बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे; परंतु या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिकांत तीव्र राेष आहे.

Web Title: Demand for bridge construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.