देसाईगंज : स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. वाय. सूर्यवंशी यांच्या विरोधात प्रशिक्षणार्थ्यांनी धरणे आंदोलन केले असून प्राचार्य हटविण्याची मागणी केली आहे.सूर्यवंशी हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य म्हणून मागील वर्षी रूजू झाले. रूजू होताच संपूर्ण प्रशासनावर स्वत:चे नियम लागू करण्याचा प्रयत्न केला. जे नियम चांगले होते, त्या नियमांना प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला. मात्र प्राचार्यांनी अतिरेक करण्यास सुरूवात केली. निर्देशक वर्गात शिकवत असताना प्राचार्य वर्गामध्ये जाऊन प्रशिक्षणार्थ्यांना आपल्याकडे बोलवत होते. त्यांच्यासोबत अनावश्यक संभाषणही करीत होते. एखाद्या विद्यार्थ्याने जवळ जाण्यास किंवा त्यांचे संभाषण ऐकण्यास नकार दिल्यास त्याला अपमानीतही करीत होते. प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेतून काढून टाकण्याच्या तसेच नापास करण्याच्या धमक्याही त्यांच्याकडून वेळोवेळी दिल्या जात होत्या. कित्येक प्रशिक्षणार्थ्यांना त्यांनी रस्त्यावरच उठबशा करायला लावले होते. प्रशिक्षणार्थ्यांबरोबरच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारीसुद्धा प्राचार्यांच्या वागण्यामुळे त्रस्त झाले आहेत. आयटीआयमधील कर्मचारी आपली ऐकत नसल्याची तक्रार प्राचार्यांनी पोलिसांमध्ये दाखल केली होती. आयटीआयच्या इमारतीची डागडुजी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र प्राचार्य सूर्यवंशी हे नेहमीच चतुर्थश्रेणी कर्मचारी किंवा प्रशिक्षणार्थ्यांकडून डागडुजीचे काम करवून घेतात. अशाच प्रकारचे काम करीत असताना मागील वर्षी एक चतुर्थश्रेणी कर्मचारी जखमी झाला होता.प्राचार्यांच्या या त्रासामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी आयटीआयच्या बाहेर धरणे आंदोलन करून सूर्यवंशी यांना हटविण्याची मागणी केली आहे. प्रशिक्षणार्थ्यांच्या या आंदोलनाला आयटीआयमधील कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला असल्याचे दिसून आले. प्राचार्यांची बदली झाल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्या प्रशिक्षणार्थ्यांनी दिला. (वार्ताहर)
देसाईगंज आयटीआय प्राचार्यांच्या विरोधात धरणे
By admin | Updated: January 12, 2015 22:49 IST