गडचिरोली : विधानसभा निवडणुकीदरम्यान गडचिरोली पोलिसांनी आखलेल्या नवीन व्युहरचनेमुळे नक्षल्यांना मोठ्या विध्वंसक घटना घडवून आणता आल्या नाही व निवडणूक शांततेत पार पाडण्यास मदत झाली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. गडचिरोली हा नक्षलग्रस्त व घनदाट जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणे अत्यंत जिकरीचे काम आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान सीपीआयएमचे दहावे स्थापना वर्ष असल्याने अबुजमाड परिसरात नक्षल हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मात्र निवडणुकीपूर्वीच जिल्हा पोलीस दलाने आक्रमक एरिया डॉमिनेशन आणि नवीन व्युहरचना रचून नक्षलवाद्यांचा मोठ्या विध्वंसक घटना घडवून आणण्याचा बेत हाणून पाडला. ४० दिवसांमध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षल्यांसोबत सहा यशस्वी चकमकी झाल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाच्या मदतीसाठी आलेल्या सीआरपीएफ, बीएसएफ व इतर पॅरामिल्ट्री फोर्सेसला मदत केंद्रावर पोहोचविणे व निवडणुकीनंतर बाहेर काढणे हे अत्यंत कठीण काम होते. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रिया उधळवून लावण्यासाठी नक्षल्यांनी मोठी व्युहरचना केली होती. मतदान केंद्रावर येण्याजाण्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात ब्लॉस्ट व अंबुश लावण्यात आले होते. सुरक्षा दलाच्या बेसकॅम्पवर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र रोड ओपनिंग व इतर शोध मोहीम राबविल्या. तसेच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जवान तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना आणण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील ताडपल्ली केंद्रावर नक्षल्यांनी हल्ला केला. विशेष अभियान पथकाच्या दोन पार्टीची मदत पाठवून नक्षल्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यात आले. याच तालुक्यातील अडंगे येथील मतदान केंद्रावर १५० च्यावर असलेल्या नक्षल्यांनी हल्ला केला. यालाही पोलिसांनी प्रत्यूत्तर दिले. अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम. राजकुमार यांनी निवडणुकीदरम्यान यशस्वी नक्षलीविरोधी अभियान राबविले. तसेच पोलीस अधीक्षक प्रशासन राजकुमार शिंदे यांनी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीस आलेल्या ११ हजार पॅरामिल्ट्री फोर्सेस व जिल्हा पोलीस दलाचे ७ हजार जवान असे एकूण १८ हजार जवानांचे योग्य नियोजन केले, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.(नगर प्रतिनिधी)
निवडणुकीदरम्यान नक्षली कारवायांमध्ये घट
By admin | Updated: October 25, 2014 01:23 IST