'त्या' निर्णयामुळे गडचिरोलीच्या प्रभावी दारूबंदीला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:25 AM2021-06-17T04:25:12+5:302021-06-17T04:25:12+5:30
सरकारने १ एप्रिल २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. मात्र, २७ मे रोजी मंत्रिमंडळाने पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील ...
सरकारने १ एप्रिल २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. मात्र, २७ मे रोजी मंत्रिमंडळाने पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील दारू सुरू करण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू पुन्हा सुरू झाल्यास दारूबंदी असलेल्या लगतच्या गडचिरोली जिल्ह्याला निश्चितच धोका होणार आहे. अनेक गावांतील संघटना व महिलांच्या अथक परिश्रमातून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीत वाढ होईल. दारूची तस्करी वाढणार, तसेच व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करून याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे मत गडचिरोलीतील ५०० गावांनी व्यक्त करीत चंद्रपूरची दारूबंदी उठविण्यासंदर्भातील निर्णयाचा निषेध केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५०० गावांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून, यात सातत्याने वाढ होत आहे.