बामणी : वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या विद्युत ताराचा स्पर्श होऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारला पहाटे ४ वाजताच्या सुमारास टेकडाताला-रेगुंठा रस्त्यावरील कुंकूमेश्वर पहाडीजवळ घडली.सुरेश शंकर दुर्गम (२२) रा. मुक्याला (जाफ्राबाद) असे मृतकाचे नाव आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी काही नागरिकांनी टेकडातालापासून पाच किमी अंतरावरील कुंकूमेश्वर पहाडी जंगल परिसरात विद्युत तारा लावल्या होत्या. या ताराचा स्पर्श झाल्याने सुरेश दुर्गम याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच टेकडाताला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवींद्र गादे, नाविसचे कार्यकर्ते राजेशम कासेटी, अशोक पेद्दी यांनी टेकडाताला पोलिसांना माहिती दिली. महावितरणचे उपअभियंता आवारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सुरेश दुर्गम याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतकाच्या कुटुंबियांना शव सूपूर्द करण्यात आला. या घटनेची पोलीस चौकशी सुरू आहे. या शिकार प्रयत्नाच्या प्रकरणात हात असणाऱ्यांच्या मागावर पोलीस असून त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती आहे. (वार्ताहर)
जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने इसमाचा मृत्यू
By admin | Updated: February 4, 2015 23:15 IST