गडचिरोली : जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून जिल्ह्याच्या विविध भागातील डेंग्यूची लागण झालेले पाच रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गावांमधील १३ डेंग्यूचे रूग्ण आष्टी येथील रूग्णालयात यापूर्वीच दाखल झाले आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये दाखल झालेल्या डेंग्यूच्या रूग्णांमध्ये रूपाली नितेश गौरकर रा. लक्ष्मीपूर ता. चामोर्शी, शुभेच्छा लोमेश मेश्राम रा. नवरगाव ता. चामोर्शी, ललिता शांताराम साखरे रा. बेंबाळ ता. मूल, कुसूम नामदेव वाळके व चंद्रभागा चंद्रशेखर मडावी दोघीही रा. गोकूळनगर गडचिरोली यांचा समावेश आहे. या पाचही जणींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गडचिरोली शहरातील गोकुळनगरमध्ये मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये डेंग्यूची साथ पसरली होती. यामध्ये शेकडो रूग्णांना डेंग्यूची लागण होऊन यापैकी दोन रूग्णांचा मृत्यू झाला होता. यामुळे या ठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. आतासुध्दा गोकुळनगर येथील दोन महिला डेंग्यूग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. यावरून डेंग्यूची साथ गोकुळनगरमध्ये आणखी प सरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होऊन ही साथ आणखी तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील हानी टाळण्यासाठी याठिकाणी विशेष शिबिर घेण्याची मागणी होत आहे. आष्टी येथील रूग्णालयात गोंडपिपरी तालुक्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या राळापेठा व ताडसा गावांमधील १८ रूग्ण दाखल झाले आहेत. यावरून जिल्ह्यासह सिमावर्ती भागामध्ये डेंग्यूची साथ पसरली असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)
जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचे थैमान
By admin | Updated: May 11, 2014 00:17 IST