धानोरा : धानोरा ग्रामीण रूग्णालयात पाणी नसल्याने शौचालयात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. येथे एकच परिचारिका कार्यरत असून त्याही निवृत्तीच्या वाटेवर आहे. एकाच डॉक्टरच्या भरवशावर साऱ्या रूग्णालयाचा भार पडलेला आहे. अशा एक ना अनेक तक्रारी बुधवारी रात्री ८.१५ वाजता रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे यांच्या कानी घातल्या. रूग्णांच्या या तक्रारी ऐकून लोकप्रतिनिधी अवाक झालेत. तत्काळ खा. अशोक नेते व दोन आमदारांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना फोन लावून या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिलेत.धानोरा हा नक्षलग्रस्त भाग असून येथील ग्रामीण रूग्णालयात छत्तीसगड सीमेलगतच्या गावातूनही विविध आजाराचे रूग्ण येतात. या रूग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. या पदाचा भार डॉ. गाठीबांधे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तेच एकटे संपूर्ण रूग्णालयातील रूग्णांना सेवा देण्याचे काम करीत आहे. रूग्णालयात पाण्याची व्यवस्थाही नाही. पाणी नियमित येत नसल्याने रूग्णालयाच्या शौचालयाची सफाईच होत नाही. त्यामुळे सर्वत्र घाण पडून आहे. एकच परिचारिका संपूर्ण रूग्णांना सेवा देण्याचे काम करते. त्याही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांनाही कामाच्या मर्यादा आहे. बुधवारी लोकप्रतिनिधींनी भेट दिल्यानंतर रूग्णालयाचा नादुरूस्त असलेला मोटारपंप गुरूवारी सकाळीच दुरूस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांना येथे तत्काळ वैद्यकीय अधिकारी पाठवा, असे निर्देश लोकप्रतिनिधींनी दिले आहे. या भेटीदरम्यान गजानन साळवे, अनंत साळवे, विनोद निंबोरकर, दिलीप गावडे, जमिल कुरेशी, साजन गुंडावार, मनोज गावडे, महादेव गणोरकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
धानोरा रूग्णालयात अस्वच्छतेचा कहर
By admin | Updated: January 15, 2015 22:52 IST