पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : वीज कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरतदेसाईगंज : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात हायमास्ट लाईट लावण्यात आले आहेत़ मात्र हायमास्ट दुरूस्तीकरिता लिफ्ट मशीन नसल्यामुळे पालिकेच्या वीज कर्र्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन दुरूस्तीचे काम करावे लागत आहे़ बहुतांश कर्मचारी कंत्राटी पध्दतीने वीज दुरूस्तीचे काम करीत आहेत़ अशावेळी कंत्राटी करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यास नगरपालिकादेखील जबाबदारी झटकण्याची शक्यता आहे. हायमास्ट लाईट दुरूस्तीकरिता लिफ्ट मशीन घेण्याची मागणी जोर धरत आहे.आधुनिकतेच्या ओढीने शहरातील रस्ते रात्रीच्या वेळी चकाचक करण्यासाठी न.प. प्रशासनाच्या वतीने मुख्य चौकात, रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हायमास्ट लाईट लावण्यात आले आहेत़ सर्वसाधारण विजेच्या खांबापेक्षा हायमास्ट लाईट दुप्पट उंच उभारावे लागतात़ इलेक्टीकल्स सामान असल्यामुळे त्याच्या देखभालीचा खर्चदेखील अधिक आहे़ शहरात चौकाचौकात हायमास्ट लागले, मात्र लाईट दुरूस्तीकरिता नगर पालिकेकडे लिफ्ट मशीन उपलब्ध नाही़ शहरातील हायमास्ट दुरूस्तीकरिता गडचिरोलीची लिफ्ट मशीन बोलवावी लागते़ निव्वळ लाईट दुरूस्तीकरिता गडचिरोली येथून मशीन आणणे परवडणारे नाही़ गेल्या काही दिवसांपासून हायमास्ट दुरूस्तीच्या कामात प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. नागरीकांच्या तक्रारीमुळे नाईलाजास्तव पालिकेच्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना हॉयड्रोलिक ट्रॅक्टरच्या ट्रालीला उंच करून त्यावर लोखंडी शिडी लावून हायमास्ट लाईट दुरूस्त करावे लागत आहे़ लाईट दुरूस्त करण्याची पध्दत अतिशय धोकादायक आहे़ मात्र नाईलाजास्तव कंत्राटी कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घालून हायमास्ट लाईट दुरूस्त करावे लागत आहे़शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले सर्व प्रकारच्या लाईटच्या देखभालीची जबाबदारी नगरपालिकेकडे आहे़ यासाठी पालिीकेत कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे हायमास्टसारख्या दुरूस्तीच्यावेळी वीज कर्मचाऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)
शहरातील हायमास्ट दुरूस्तीसाठी जीव धोक्यात
By admin | Updated: June 1, 2015 02:03 IST