१३ गावांना फटका : आरमोरी तालुक्यातील अनेक शेत अद्यापही पाण्यातठाणेगाव : वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा, गाढवी, खोब्रागडी या तीनही नद्यांमुळे पूर परिस्थिती बिकट झाली व नदीकाठावरील शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्यापही शेताच्या बांधीमध्ये पाणी जमा असल्याने धानपीक वाहून गेले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. देऊळगावजवळ वैनगंगा, गाढवी आणि खोब्रागडी या तीन नद्यांचा संगम आहे. तसेच वैनगंगा नदीला गोसेखुर्द, पुजारी टोला व संजय सरोवराचे पाणी सोडण्यात येत आहे. तसचे गाढवी नदीला इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने आरमोरी तालुक्यातील आरमोरी, डोंगरगाव, ठाणेगाव, देऊळगाव, इंजेवारी, डोंगरसावंगी, चुरमुरा, किटाळी, शिवणी, वघाळा, वासाळा, रामाळा, कनेरी या गावातील शेतकऱ्यांची शेती पूराखाली आलेली आहे. दरवर्षीच नद्यांना धरणाचे पाणी सोडल्याने या भागातील शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसतो. दुबार पेरणीचे संकट कायम असताना धरणातून पाणी सोडल्याने मानवनिर्मित संकटाचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
धरणाच्या पाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By admin | Updated: July 27, 2014 00:06 IST