गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी या राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील बसगाड्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. या बसमधून प्रवास करताना कधी बस तुटेल, अशी भिती प्रवाशांनाही वाटू लागली आहे. वाढत्या उष्णतामानात अशा बसगाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशाचे प्रचंड हाल होत आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. अशा अवस्थेतील बसगाड्या दुर्गम भागात व ग्रामीण भागात पाठविल्या जात आहे. चंद्रपूर विभागीय कार्यालयांतर्गत गडचिरोली व अहेरी हे दोन आगार चालविले जातात. या दोनही आगारातून गडचिरोली जिल्ह्यातील कमीअधिक ७०० गावांमध्ये बसफेर्या पाठविल्या जातात. याशिवाय राज्याच्या अनेक भागात या बसेस जातात. गडचिरोली आगारात १०५ बसगाड्या आहेत. तर अहेरी आगारात ८० बसगाड्या आहेत. यातील निम्म्याहून अधिक बसगाड्या जर्जर झालेल्या आहेत. अनेक बसगाड्यांचे आसन तुटलेले आहेत. काहींच्या छतांना छिद्र पडलेले आहेत. अनेक बसगाड्यांच्या खिडक्या निघून गेल्या असून तावदाणही फुटलेले आहेत. त्या दुरूस्त करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस अंगावर घेत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. अनेक बसगाड्यांचे खिडक्यांचे काच निघून असून अशा बसमधून गरम वारा वेगाने येतो. उन्हाळ्याच्या दिवसात आधीच उकाडा त्यातही एसटीचा असा प्रवास यामुळे प्रवाशी प्रचंड त्रस्त आहेत. या नादुरूस्त बसगाड्यांमुळे प्रवासाला वेळही अधिक लागत आहे. तसेच या बसगाड्यांच्या वेगावरही मर्यादा आली आहे. बसगाड्यांची दुरूस्ती थातूरमातूर करून त्या प्रवाशांच्या सेवेत पाठविल्या जातात. अशा बसगाड्यांमुळे अपघातही होण्याची दाट शक्यता आहे. परंतु याकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
डॅमेज बसगाड्यांनी प्रवाशी त्रस्त
By admin | Updated: May 11, 2014 23:39 IST