श्रावणमास प्रारंभ : मंदिर ट्रस्टच्या वतीने तयारी सुरूचामोर्शी : शनिवारपासून श्रावणमासाला सुरूवात झाली असून यानिमित्त विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथील मंदिरात भाविकांची गर्दी उसळणार आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराचे दर्शन पवित्र मानले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात मार्र्कंडा देवस्थानाला भेट देऊन पूजा, अर्चा करणाऱ्यांची गर्दी वाढते. मार्कंडेश्वर मंदिराच्या आतमध्ये पावसाचे पाणी झिरपत असल्याने मंदिराच्या गाभाऱ्यात व इतर ठिकाणी ओलावा दिसून येत आहे. मंदिरात स्थायी विद्युत व्यवस्था नाही. त्यामुळे मंदिर ट्रस्टने तात्पुरत्या स्वरूपात विद्युतची व्यवस्था केली आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकर व शिवलिंगाची पूर्जाअर्चा, अभिषेक महिनाभर सुरू राहते. दरदिवशी शेकडोच्या संख्येने भाविक येतात. भाविकांना बिल्वार्चन महापूजा व अभिषेक करण्यासाठी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारावर असलेल्या शिवलिंगाजवळ व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांचे जत्थे मार्कंडा येथे दाखल होतात. त्यामुळे मार्कंडा येथे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. शांतता व सुव्यवस्थेसाठी बंदोबस्त करण्यात आला असून भाविकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामोजी तिवाडे, कोषाध्यक्ष पा. गो. पांडे, विश्वस्त माजी खासदार मारोतराव कोवासे, हरिभाऊ खिनखिनकर यांनी केले आहे.
मार्कंड्यात वाढणार भाविकांची गर्दी
By admin | Updated: August 17, 2015 01:20 IST