जिल्ह्यातील भाविकांची मेडारामात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:00 AM2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:24+5:30

समक्का-सारक्का ही जत्रा देशभरात प्रसिध्द आहे. या जत्रेला भाविकांची होणारी गर्दी बघून या जत्रेला कुंभमेळा असेही संबोधले जाते. अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांमधील नागरिकांचे रोटीबेटी व्यवहार तेलंगणातील नागरिकांसोबत होतात. येथील बहुतांश नागरिकांची मातृभाषा तेलगू आहे. त्यामुळे तेलंगणातील श्रध्दांचा प्रभाव सिरोंचा, अहेरी तालुक्यांमधील नागरिकांवर दिसून येते.

The crowd of devotees in the district | जिल्ह्यातील भाविकांची मेडारामात गर्दी

जिल्ह्यातील भाविकांची मेडारामात गर्दी

Next
ठळक मुद्दे८ फेब्रुवारीपर्यंत मुख्य धार्मिक विधी : सिरोंचा, अहेरी तालुक्यातील भाविकांचे जत्थे तेलंगणात रवाना

कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ११० किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील मुलूगू जिल्ह्यातील मेडाराम येथे ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत समक्का-सारक्का जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेला गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भाविकांनी गर्दी केली आहे.
समक्का-सारक्का ही जत्रा देशभरात प्रसिध्द आहे. या जत्रेला भाविकांची होणारी गर्दी बघून या जत्रेला कुंभमेळा असेही संबोधले जाते. अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांमधील नागरिकांचे रोटीबेटी व्यवहार तेलंगणातील नागरिकांसोबत होतात. येथील बहुतांश नागरिकांची मातृभाषा तेलगू आहे. त्यामुळे तेलंगणातील श्रध्दांचा प्रभाव सिरोंचा, अहेरी तालुक्यांमधील नागरिकांवर दिसून येते. सिरोंचा शहरापासून केवळ ११० किमी अंतरावर मेडाराम येथे समक्का, सारक्का देवीची जत्रा भरते. गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम होण्याच्या पूर्वी नागरिक गोदावरी नदीतून डोंग्याने प्रवास करीत होते. अनेक हालअपेष्टा सहन करून मेडाराम जत्रेला हजेरी लावत होते.
यावर्षी ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत जत्रेचे आयोजन केले आहे. या जत्रेला तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच गडचिरोली जिल्ह्यातील भाविकांनी सुध्दा हजेरी लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भाविकांंसाठी तेलंगणा सरकारने तसेच महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाने बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. बसची सुविधा झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांची संख्या सुध्दा वाढली आहे. ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत मुख्य धार्मिक कार्यक्रम राहत असल्याने या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. मुख्य धार्मिक कालावधी संपल्यानंतरही जवळपास १५ दिवस जत्रेमध्ये भाविकांची गर्दी दिसून येते.
वाहतुकीची साधने वाढल्याने प्रत्येक जत्रेच्या वेळी भाविकांची गर्दी उसळत आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तेलंगणा शासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविल्या आहेत. काही भाविक सकाळी मेडारामला जाऊन देवीचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळपर्यंत परत येतात. काही भाविक मात्र दोन ते तीन दिवसांच्या मुक्कामाने जातात. आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, यासाठी काही भाविक नवस फेडतात. समक्का-सारक्का यात्रेला जाणारे भाविक मुंडण करूनच परततात. मेडारामची जत्रा मागील शेकडो वर्षांपासून भरत असल्याने या जत्रेचे अनेक साक्षीदार आहेत. सदर नागरिक जुन्या काळातील समक्का-सारक्का जत्रेचा अनुभव सांगत असल्याचे दिसून येतात.

जपन्नाच्या अश्रूंनी तयार झाला वागू
जपन्ना हा समक्का देवीचा मुलगा होता. तर सारक्का ही समक्काची मुलगी होती. युध्दादरम्यान समक्का देवीचा मुलगा जपन्ना हा मृत्यूमुखी पडला. त्याचे रक्त वाहत गेल्याने त्यापासून मेडाराम येथे वागूची (नाल्याची) निर्मिती झाली. त्याला जपन्नावागू असे म्हटले जाते. अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या नाल्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणारी येणारा प्रत्येक भाविक नाल्यात स्नान करते.

आठ दिवसांचा प्रवास करून बैलबंडीने गाठत होते मेडाराम
मेडाराम येथील जत्रा सुमारे ९३६ वर्षांपूर्वी पासून भरत आहे, अशी माहिती जुने जाणकार देतात. सिरोंचा व मेडाराम या दरम्यान गोदावरी ही विस्तीर्ण नदी वाहते. पुलाची निर्मिती होण्यापूर्वी तसेच वाहनांच्या सुविधा होण्यापूर्वी अहेरी, सिरोंचा परिसरातील नागरिक बैलबंडीने मेडारामला जात होते. मेडाराम हे गाव सिरोंचापासून सुमारे ११० किमी अंतरावर आहे. हे अंतर पार करताना सर्वात प्रथम गोदावरीचा अडथळा दूर करावा लागत होता. गोदावरीच्या पात्रातून बैलबंड्या नेल्या जात होत्या. जवळपास आठ दिवस बैलबंडीने प्रवास केल्यानंतर मेडाराम येत होते. आजच्या तुलनेत जंगलही अधिक होते. मात्र समक्का व सारक्का देवीवर असलेल्या श्रध्देमुळे जंगल, पाणी यांची भिती वाटत नव्हती, अशी माहिती सिरोंचा येथील वयोवृध्द नागरिक देतात.

मेडाराम येथे दोन ते तीन दिवस जत्रेत थांबल्यानंतर पुन्हा आठ दिवसांचा परतीचा प्रवास सुरू होत होता. म्हणजेच जत्रेला जाण्यासाठी किमान २० दिवस लागत होते. २० दिवसांच्या प्रवासाने शरीर जरी थकले राहत असले तरी समक्का व सारक्का देवीचे झालेले दर्शन डोळ्यात साठविल्यानंतर मनाला उर्जा देत होते, अशी माहिती वयोवृध्द भाविक देतात.

पूर्वी वाहतुकीच्या सुविधा नसल्याने महिनाभर जत्रा भरत होती. आता मात्र वाहतुकीच्या सुविधा निर्माण झाल्याने १५ दिवसांची जत्र भरते. काही भाविक एक दिवस जत्रा बघून आलेल्या वाहनाने परत जातात.

Web Title: The crowd of devotees in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.