गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावरून सहा वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या महिला अधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना शहरापासून ५ किमी अंतरावरील नवेगाव पेट्राेल पंपाच्या मागील परिसरात सुयाेगनगरात दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गडचिराेली शहर हादरले आहे. कल्पना केशव उंदिरवाडे (६४, रा. नवेगाव), असे मृतक सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. पाेलिसांनी नातेवाईक असलेल्या एका संशयीताला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
सदर घटनेची माहिती कळताच गडचिराेलीचे पाेलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी आपल्या सहकारी पाेलिस कर्मचाऱ्यांसाेबत घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला. घटनेचा पंचनामा करण्यात आला.
कल्पना उंदिरवाडे या आपल्या मुलासाेबत सुयाेगनगरातील घरी राहत हाेत्या. त्यांच्यासाेबत घरकाम करणाऱ्या शांताबाई अंबादास मुळे (६०, रा. नवेगाव) यासुद्धा राहत हाेत्या. उंदिरवाडे यांचे राहते घर दुमजी असून, खाली व वरच्या मजल्यावर तीन फॅमिली रूम आहेत. सर्वात वरच्या मजल्यावर तीन सिंगल रूम असून, त्याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुली राहत आहेत. सर्वच खाेल्या किरायाने दिल्या आहेत.
गडचिराेली पाेलिसांनी रात्री उशिरापर्यंत किरायदार व शेजाऱ्यांचे तसेच नातेवाईकांचे बयाण घेतले. रात्री उशिरापर्यंत याबाबत काेणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.
तिन्ही भावंडांचे आंतरजातीय विवाह
कल्पना साेनकुसरे, लहान बहिण गायत्री साेनकुसरे व भाऊ माेहन साेनकुसरे या तिघांचेही आंतरजातीय विवाह झाले आहेत. भाऊ माेहन हे पाेलिस दलात नाेकरीला आहेत.
खाेलीत रक्ताचा सडा
घटनेच्या आदल्या दिवशी काम करणाऱ्या शांताबाई मुळे या कामानिमित्त गावाला गेल्या हाेत्या. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास शांताबाई घरी आल्या. हाॅलच्या समाेर जात बेडरूममध्ये बघताच रक्ताच्या थाराेळ्यात कल्पना उंदिरवाडे पडल्या हाेत्या. त्यांनी घराबाहेर पडून शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
आई-मुलाची सकाळची भेट ठरली अखेरची
कल्पना उंदिरवाडे यांना ‘साकार’ नावाचा २५ वर्षीय दत्तकपुत्र आहे. ताे वैरागड येथे पदवीचे शिक्षण घेत असून, सध्या तेथे प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. साकार हा सकाळी चहा, नाष्टा करून वैरागड येथे प्रात्यक्षिक परीक्षेला गेला हाेता. त्याच्या अनुपस्थितीत घरी हृदय हेलावणारी घटना घडली. आई-मुलाची आजची सकाळची भेट ही अखेरची भेट ठरली