वातावरणातील बदल : बालके, वृद्धांच्या आरोग्यावर परिणामगडचिरोली : मागील १० दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. दिवसा ऊन व रात्रीची थंडी या प्रतिकूल वातावरणामुळे सर्दी-खोकला व ताप या आजाराने डोके वर काढले. घरोघरी सर्दी-तापाच्या रूग्णांमुळे नागरिकदेखील या आजाराने बेजार झाले आहेत.वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना आजाराचे लवकर संक्रमण होते. सायंकाळनंतर खूप थंडी व सकाळनंतर असह्य उकाडा अशा वातावरणामुळे रूग्णांच्या संख्येत मोठा प्रमाणात वाढ होत आहे. वातावरणातील अचानक बदलामुळे विषाणुजन्य आजारातदेखील मोठा प्रमाणात वाढ झाली आहे. आधीच श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींना या वातावरणाचा अतीव त्रास होत आहे. गावागावांतील प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, खासगी रुग्णालये रुग्णांच्या संख्येमुळे खच्चून भरले आहेत. सर्दी-पडसे, खोकला व त्यामुळे आलेल्या तापाच्या आजारावर वेळीच उपचार न केल्यास पुन्हा ताप येतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे व तज्ज्ञांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
थंडीमुळे खोकला रुग्णात वाढ
By admin | Updated: November 15, 2015 00:59 IST