चामोर्शी : कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी, जिल्हा बंदी आदी उपाय योजना सुरू केल्या असून, याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे. मात्र, नवविवाहित मुलींना आपल्या माहेर दुरावल्याची खंत मनात सारखी बोचत असल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊन कालावधीतही लग्न सोहळे पार पडत आहेत. एकदा लग्न लावून गेलेली मुलगी परतीला न येता सासरी रममाण होण्याची पाळी आली आहे. लग्न झाल्यावर मुली किमान दोन ते तीनवेळा माहेरी येत असतात. मात्र, जिल्हाबंदी असल्याने त्यांना येणे शक्य नाही. उन्हाळी सुट्टीत मुलांना शाळा नसते. अशा अवस्थेत चार दिवस माहेरी जाऊन तेथील वातावरणात रममाण होण्याची मनोमन इच्छा प्रत्येक विवाहित मुलींना असते. मात्र, कोरोनाने माहेरची वाट दूर गेली आहे. सध्या विवाहित मुली आपल्या माहेरातील आई, वडील व इतर मंडळींशी मोबाईलने आभासी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात कधी व्हिडिओ कॉल करून माहेरातील आठवणीला उजाळा देत आहेत. प्रत्येक विवाहित मुलीला आपल्या माहेरची आठवण येणे साहजिकच आहे. अशातच कोरोनामुळे माहेरातील पाहुणचारालासुद्धा मुकावे लागले आहे. लग्न सोहळ्यासाठी केवळ २५ जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. माहेरी होणाऱ्या आप्तस्वकियांच्या लग्न सोहळ्यातही उपस्थिती दर्शविणे कठीण झाले आहे. तसेच अंत्यविधीसाठीसुध्दा उपस्थितीची अट घालून दिली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी जाणे अवघड जात आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी संकटाने जीव कासावीस झाला आहे. नातेवाईकांच्या उन्हाळी भेटीवर विरजण पडले आहे. केव्हा लॉकडाऊन मोकळे होईल व कधी माहेरी जाईन, याची ओढ लागली आहे.