मुरूमगाव : धानोरा पंचायत समिती अंतर्गत मुरूमगाव येथे १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत अनेक नागरिकांनी घरकूल बांधकामाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक पवित्रा घेतला.काही नागरिकांना घरकूल योजनेचा दोनदा लाभ देण्यात आला आहे. मात्र दारिद्र्य रेषेखालील प्रतीक्षा यादीतील कुटुंबाना घरकूल योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप ग्रामसभेत नागरिकांनी केला. घरकूलाच्या मुद्यावर बराचवेळ चर्चा करण्यात आली. यामुळे काही काळ ग्रामसभेत तणाव निर्माण झाला होता. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रोहोयाचे काम केलेल्या मजुरांची नावे यादीमध्ये नाही. याउलट प्रत्यक्षात रोजगार हमी योजनेचे काम न करणाऱ्या मजुरांच्या नावाने वेतन काढण्यात आल्याचाही मुद्दा नागरिकांनी ग्रामसभेत उपस्थित केला. रोजगार सेवकांच्या गलथान कारभारावर उपस्थित नागरिकांनी ग्रामसभेत रोष व्यक्त केला. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन रोजगार सेवकाला अभय देत असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला. मुरूमगाव ग्रामपंचायतीअंतर्गत खेडेगाव, बेलगाव व आमपायली आदी गावे समाविष्ट आहेत. या गावातील अनेक नागरिक ग्रा.पं.स्तरावरील शासकीय योजनांपासून वंचित आहे. या ३ गावांसाठी स्वतंत्र गट ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. (वार्ताहर)
घरकुलाच्या मुद्यावर वादंग
By admin | Updated: August 18, 2014 23:29 IST