रवी रामगुंडेवार - एटापल्लीएटापल्ली हा गडचिरोली जिल्ह्याचा संवेदनशिल व नक्षलग्रस्त तालुका आहे. या भागात नागरिकांना पायाभूत व मुलभूत सुविधा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कसोसीने प्रयत्न करीत आहे. मात्र दूरसंचार विभाग एटापल्ली तालुक्याला सेवा पुरविण्याच्या कामात प्रचंड उदासीन असल्याचा दिसून येत आहे. एटापल्ली तालुक्यात १९८ गावे आहेत. यापैकी केवळ एटापल्ली या तालुका मुख्यालयाच्या गावात बीएसएनएलची दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा आहे. उर्वरित एकाही गावात अद्याप सेवा पोहोचलेली नाही. एक फोन लावण्यासाठी अनेकदा प्रयत्न करावा लागतो. बाहेरून येणारे फोन तर येतच नाही. दिवसातून अनेकवेळा मोबाईल सेवेचे कव्हरेज गायब होते. या साऱ्या बाबींची दखल घेऊन चांगली दूरसंचार सेवा उपलब्ध व्हावी म्हणून एटापल्ली तालुक्यात पाच मोबाईल टॉवर उभारण्याचे मंजूर देण्यात आली होती. नक्षलवाद्यांचा या कामाला विरोध राहू शकतो व त्यांच्याकडून धोका होईल ही बाब गृहीत धरून पोलीस ठाण्याच्या आवारात टॉवर उभारणीला मंजूर देण्यात आली होती. तालुक्यात ज्या ठिकाणी पोलीस ठाणे आहे. त्या ठिकाणी म्हणजे हेडरी, गट्टा, हालेवारा, कसनसूर, जारावंडी या पाच गावांचा समावेश होता. ३१ मार्च २०१४ पर्यंत हे काम पूर्ण करावयाचे होते. परंतु अद्याप एकाही कामाला सुरूवात करण्यात आलेली नाही. टॉवर मंजूर होऊन उभारण्याची मुदतही संपून तीन महिने झाले. आलेल्या कामाचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निधी परत जाऊ नये म्हणून दूरसंचार खात्याने काम सुरू करावे, अशी या भागातील जनतेची मागणी आहे. कसनसूर येथे मोबाईल टॉवर उभारण्याकरीता मागील १० वर्षांपासून सामान येऊन पडून आहे. काही सामानाला जंगही चढला आहे. परंतु दूरसंचार विभागाचे दुर्लक्ष आहे. एटापल्ली येथे एका खासगी कंपनीने मागील पाच वर्षापूर्वी एक मोठे टॉवर उभारले. परंतु तालुक्यास सेवा देण्यास नकार दिला. बीएसएनएलची सेवा फक्त एटापल्ली गावातच सुरू आहे. या सेवेलाही अनंत अडचणी आहे. एटापल्ली येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होतो. त्या पाठोपाठ मोबाईल सेवासुध्दा बंद होते. हे दोनही विभाग एकमेकांना सेवा बंद करण्यास सहकार्य करतात, असे चित्र आहे.
बीएसएनएलचे टॉवर उभारणीचे काम ठप्पच
By admin | Updated: June 25, 2014 00:27 IST