लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रस्त्यावर बांधकाम किंवा इतर साहित्य ठेवल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अपघात होऊन जीव गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. रस्त्यावर साहित्य ठेवणाऱ्यांवर दंड ठोठावण्याची तरतूद आहे. मात्र, स्थानिक प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचे वास्तव जिल्ह्यात बघायला मिळते.
शहरातील जुन्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे जागा खरेदीकरून घर बांधणे शक्य होत नाही. परिणामी भावाभावांचे हिस्से झाले, तरी त्याच घरात राहावे लागते. काही नागरिक नालीपर्यंत घराचे बांधकाम करतात. अंगणच नसल्याने रेती, लोखंड, गिट्टी आदी बांधकाम साहित्य रस्त्यावरच ठेवले जाते. आधीच रस्ता अरुंद त्यात त्याच रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होते. वेळप्रसंगी वाहन घसरून अपघात झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. ही स्थिती केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातही आहे. गावातही नागरिक थेट रस्त्यावरच बांधकामाचे साहित्य ठेवत असल्याचे दिसून येते.
गावांत रस्त्यावरील जनावरांमुळे वाहतुकीस अडथळाग्रामीण भागातील रस्ते आता सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत. त्यामुळे काही पशुपालक थेट रस्त्यावर जनावरे बांधतात. जनावरांचे मलमूत्र त्याच ठिकाणी असते. याचा सामना वाहनधारकांना करावा लागतो. दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर जनावरे बांधण्याची समस्या अतिशय गंभीर होत चालली आहे. पहाटेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत ही जनावरे थेट रस्त्यावर बांधली राहतात.
तक्रारच नाही, तर कारवाई कशी होणार?एखादा व्यक्ती रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवत असेल, तर त्याबाबत संबंधित व्यक्तीने तक्रार करायला पाहिजे. मात्र, तक्रार केली जात नाही. परिणामी कारवाई करताना नगर परिषद व ग्रामपंचायतीलाही मर्यादा पडतात.
अतिक्रमणाने शहरातील रस्ते झाले अरुंदथेट रस्त्यापर्यंत घराचे बांधकाम केले जाते. परिणामी रस्ते अरुंद झाले आहेत. नाली बांधण्यासाठीसुद्धा जागा शिल्लक राहत नाही. एक चारचाकी वाहन रस्त्यावर असेल तर दुसरे वाहन जायला जागा राहत नाही, अशी स्थिती अनेक वॉर्डाची आहे. त्यामुळे वॉर्डात भांडण, तंटे निर्माण होतात.
चारचाकी वाहने रस्त्यावरच पार्क
- कार ही आता शहरातील नागरिकांची गरज बनत चालली आहे. बहुतांश कर्मचारी, व्यावसायिक लाखो रुपयांची कार खरेदी करतात. मात्र त्यांच्याकडे घरी कार ठेवण्यासाठी जागा नसते. परिणामी ते रस्त्यावरच कार पार्क करतात.
- रस्ता अगोदरच अरुंद त्यात २ रस्त्यावर कार राहत असल्याने दुसरी कार पुढे जात नाही. त्यातून भांडणे होतात. दिवसेंदिवस शहरातील नागरिकांकडे वाहनांची संख्या वाढत चालली आहे.
"रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणे चुकीचे आहे. रात्रीच्या सुमारास अपघात घडतात. रेतीवरून वाहन घसरल्याने जीव जाऊ शकतो. नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. विशेषकरून रहदारी जास्त असलेल्या रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेऊ देऊ नये."- नीलेश भुरसे, नागरिक, गडचिरोली.