भामरागडातील परिस्थिती : पर्लकोटा नदीत अवैध रेती उत्खननंंगडचिरोली : राज्यपालांनी दत्तक घेतलेला भामरागड तालुका मुख्यालयात पर्लकोटा- पामुलगौतम-इंद्रावती या नद्यांचा संगम आहे. येथे बाराही महिने पाणी राहते. त्यामुळे रेती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. याचाच फायदा सध्या अवैध रेती उत्खनन करणारे घेत असल्याचे दिसून येत आहे. भामरागड तालुक्यात करोडो रूपयांच्या निधीतून शासकीय कार्यालय इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. या बांधकामासाठी लागणारी रेती पर्लकोटा नदीच्या पात्रातून अवैधरित्या उपसून नेली जात आहे. यासाठी महसूल प्रशासनाकडून कोणताही परवाना घेण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे. रेती तस्करांनी शासनाच्या बांधकामासाठी रेती लागते म्हणून नियमबाह्यपणे येथे रेती उत्खनन सुरू केले आहे. दररोज अनेक ट्रॅक्टरच्या सहाय्याने मजुरांकरवी रेती भरून त्याची वाहतूक केली जाते. या साऱ्या प्रकाराकडे भामरागड तहसील कार्यालयाच्या प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अवैध व विनापरवाना उपशामुळे शासनाच्या महसुलावरही पाणी फेरल्या गेले आहे. (प्रतिनिधी)
शासकीय बांधकामांसाठी अवैध रेतीचा उपसा जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 02:12 IST