लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/विसोरा : गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असून येथील ७० टक्के कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. हलक्या व मध्यम प्रतीच्या धानाच्या कापणी व बांधणीचा हंगाम सुरू असून काही शेतकरी यंत्राद्वारे मळणीचेही काम सुरू केले आहे. धान कापणी, बांधणी व मळणीच्या कामातून शेकडो पुरूष व महिला मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे.आदिवासी विकास महामंडळाने आधारभूत धानखरेदी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ८८ केंद्रांना मंजुरी दिली आहे. मात्र परतीच्या पावसाने कापणी व बांधणीच्या कामाला थोडा विलंब झाल्याने एकाही धान केंद्रावर धानाची आवक झाल्याचे दिसून येत नाही. गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी कुटुंबाची संख्या सर्वाधिक चामोर्शी तालुक्यात आहे. याशिवाय आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली तालुक्यातही धानाचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. यंदाच्या खरीप हंगामात दोन लाख वर हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी विविध प्रजातीच्या धानपिकाची लागवड केली. धानाची झटपट खरेदी व्हावी, यासाठी संबंधित केंद्रावर धान लवकर नेता यावे, याकरिता बहुतांश शेतकरी गेल्या काही वर्षांपासून थेट शेतातच मळणी यंत्र नेऊन यंत्राच्या सहाय्याने धानाची मळणी करीत आहेत. मजुरांपेक्षा यंत्राद्वारे मळणीचे काम गतीने होत असल्याने जिल्ह्यात धान मळणी यंत्राची संख्याही प्रचंड वाढली आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मजुरांचे धान कापणी व बांधणीच्या कामासाठी गट तयार करण्यात आले आहे. अनेक शेतकरी या गटांना धान कापणी व बांधणीचा गुता देत आहेत. गुताच्या माध्यमातून धान कापणी व बांधणीचे काम गतीने होत असल्याने यंदा अनेक मोठ्या शेतकºयांनी या कामाचा गुता दिला असल्याची माहिती आहे. सध्या ग्रामीण भागात धान कापण व बांधणीच्या हंगामाने वेग घेतला आहे.
धान मळणीच्या कामात यंत्राचा सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:18 IST
गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असून येथील ७० टक्के कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती या व्यवसायावर अवलंबून आहे.
धान मळणीच्या कामात यंत्राचा सर्रास वापर
ठळक मुद्देरोजगार उपलब्ध : समूहाने होत आहे कापणी-बांधणीचे काम