देवापूर परिसरात २० हेक्टर जागा मिळणार गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी २०११ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाला चामोर्शी मार्गावर वन विभागाची २० हेक्टर जमीन द्यावयाची आहे. या जमिनीची गुरूवारी वनहक्क समिती देवापूरचे सदस्य व नगर परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठाने शैक्षणिक व प्रशासकीय संकुलाकरिता २० हेक्टर जागेची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्याकरिता सर्वे नंबर ९६ ही वन जमीन विद्यापीठाने निवड केली असून वनहक्क समितीच्या ठरावाची गरज असल्याने वनहक्क समिती देवापूरचे अध्यक्ष तथा नगर पालिकेचे शिक्षण सभापती विजय गोरडवार, न.प.चे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, न.प.चे अभियंता गिरीष मैंद, लिपीक ताकसांडे, तलाठी गेडाम, गोंडवाना विद्यापीठाचे बांधकाम अभियंता राठोड, वनहक्क समितीचे सदस्य नईमभाई शेख, गिरीष खाडीलकर यांनी जागेची पाहणी केली. सदर जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण व अन्य कुणाचीही मागणी नसल्याने सदर जागेचा ठराव वनहक्क समितीकडून देण्यास काहीही हरकत नाही, अशी माहिती वनहक्क समितीचे अध्यक्ष विजय गोरडवार व सदस्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या जागेचा मार्ग आता सुकर झाला आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठासाठीच्या जागेची वनहक्क समितीकडून पाहणी
By admin | Updated: August 12, 2016 00:49 IST