गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शाळांची वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या नेतृत्वात जि.प. शिक्षण व सर्व शिक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १४ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शाळांना आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीदरम्यान तब्बल १३ शाळा बंद स्थितीत दिसून आल्या. या शाळांच्या मुख्याध्यापकांसह २९ शिक्षकांना जि.प.च्या शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. यामुळे जिल्ह्यातील कामचुकार मुख्याध्यापक व शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.यापूर्वी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना ग्रामीण व दुर्गम भागातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती व तलाठी कार्यालयांना आकस्मिक भेट देऊन तेथील वस्तूस्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय संपदा मेहता यांनी स्वत: कुरखेडा तालुक्यात गुप्त दौरा करून वस्तूस्थिती जाणून घेतली होती. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनीही आकस्मिक भेटी देऊन शालेय प्रशासन शिस्तबध्द करण्याचा प्रयत्न केला होता. १४ जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील बांडीयानगर, गुरूनोली, मोकेला, सिंगनपल्ली, ताडगाव, या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना शाळेच्यावेळी आकस्मिक भेटी देण्यात सदर भेटीत या पाचही शाळा बंद स्थितीत आढळून आल्या. सर्व शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक यु. के. दुर्गे यांनी धानोरा पंचायत समितीमधील झरी, येडमपायली, चिचोडा, पेंढरी, दिंडवी, जारावंडी, पुलखल, फुलबोडी व साखेरा या नऊ शाळांना आकस्मिक भेटी दिल्या. यात चिचोडा, पेंढरी, दिंडवी या तीन शाळा बंद स्थितीत दिसून आल्या.सर्व शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी आर. बी. आक्केवार यांनी कुरखेडा पंचायत समितीमधील धनेगाव, दामेश्वर, कातलवाडा, चिचखेडा, रानवाही, मालेवाडा, चिपली जिल्हा परिषदेच्या या सात शाळांना आकस्मिक भेट दिल्या. याप्रसंगी त्यांना धनेगाव, दामेश्वर, कातलवाडा, चिचटोला व रानवाही या चार शाळा बंद स्थितीत दिसून आल्या. बी. जे. अजमेरा यांनी कोरची पंचायत समितींतर्गत मोहगाव, कोसमी, भिमपूर, मोहगाव, कोरची व बेडगावदेखील शाळांना भेट दिली. यावेळी या सर्व शाळा व्यवस्थित सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. सर्व शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी यु. एन. राऊत यांनी अहेरी पंचायत समितींतर्गत रेपनपल्ली (नवीन), येंकाबंडाटोला, येंकाबंडा व गेरा या शाळांना भेट दिली. यावेळी या सर्व शाळा व्यवस्थित सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. आकस्मिक शाळा भेटीचा कार्यक्रम प्रत्येक आठवड्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)देवसरा शाळेत पोषण आहाराला दांडीएम. एस. दोनाडकर यांनी धानोरा पंचायत समितींतर्गत सिंदेसूर, जयसिंगटोला, इरूपढोडरी, सुरसुंडी, मुरमाडी व देवसरा येथील शाळांना भेट दिली. या सर्व शाळा सुरू होत्या. मात्र देवसरा या एक ते सातच्या शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्यात आले नसल्याचे दिसून आले. या संदर्भात संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. शिक्षकांनी शाळा बंद ठेवणे हे आरटीईअंतर्गत गुन्हा आहे. यापुढे आकस्मिक भेटीदरम्यान जिल्ह्यातील शाळा बंद आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासन कसूर करणार नाही. भेटी दरम्यान बंद आढळलेल्या शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. - उल्हास नरड, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
दुर्गम भागातील १३ शाळा बंद
By admin | Updated: January 24, 2015 00:55 IST